
२७ ग्रामपंचायतीसाठी ७३३ उमेदवारी अर्ज दाखल .
- by Rameshwar Gawai
- Jan 01, 2021
- 756 views
बदलापूर(प्रतिनिधी): ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ तालुक्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. २७ ग्रामपंचायतींच्या होणाऱ्या या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरच्या दिवसापर्यंत ७३३ उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती तहसीलदार जयराज देशमुख यांनी दिली.
अंबरनाथ तालुक्यातील आंबेशिव,चरगाव, कान्होर, चामटोली, सावरे, काकोळे, डोणे, गोरेगाव, सांगाव, साई, राहटोली, पोसरी,मुळगाव, चोण, ढवळे-कुडसावरे, नार्हेण, ढोके-दापीवली, दहिवली, कासगाव, बरदुल, उसाटने, वाडी, खरड, आस्नोली, मांगरूळ व नेवाळी या २७ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची बुधवारी अखेरची तारीख होती. अखेरच्या तारखेपर्यंत ७३३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची छाननी झाल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ४ जानेवारी पर्यंत आहे. १५ जानेवारीला निवडणूक होणार असून १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारपासून उमेदवारांची व त्यांच्या समर्थकांची अंबरनाथ तहसीलदार कार्यालयात गर्दी झाल्याचे दिसत होते.अंबरनाथ तालुक्याच्या ग्रामीण भागातून चारचाकी, दुचाकी वाहनातून तहसीलदार कार्यालयात सकाळपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येत होते. त्यामुळे तहसीलदार कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत होते.
महाविकास आघाडी नाही
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर पहिल्यांदाच होत असलेल्या तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र सध्या तरी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी महाविकास आघाडीबाबत काहीही निर्णय झाला नसल्याची माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख एकनाथ शेलार यांनी दिली. या निवडणुकीत शिवसेना सर्वाधिक जागा जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम