विवाहाचा वाचलेला खर्च मुख्यमंत्री सहायता निधीला बदलापूरातील तरुणाने जपली सामाजिक बांधिलकी.

बदलापूर(प्रतिनिधी) : सामाजिक कार्यात योगदान देण्याची इच्छा असली तर नक्कीच मार्ग सापडतो. बदलापूरतील एका तरुणाने विवाहाचा वाचलेला खर्च कोविड-१९ साठी मुख्यमंत्री सहायता  निधीला दिला असून त्याने सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी केलेल्या या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

बदलापूरातील किरण भालेराव यांचा छोटेखानी विवाहसोहळा अनिकेत डायनिंग हॉल मध्ये पार पडला. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच नातलगांच्या व कुटुंबियांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न झाला. समाजासाठी अनेक लोक काही न काही देण्याचा प्रयत्न करीत असतात. आपणही अशीच सामाजिक बांधिलकी जपून यथाशक्ती काहीतरी केले पाहिजे असे किरण यांना वाटत होते. त्यामुळे विवाहसोहळा थाटामाटात न करता कमीत कमी खर्चात करून वाचलेला खर्च कोविड-१९ साठी मुख्यमंत्री सहायता  निधीसाठी देण्याचे किरण यांनी ठरविले होते.त्यानुसार साधेपणाने व कोविडच्या नियमांचे पालन करून हा विवाहसोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याच्या खर्चातून वाचलेले ३०,००१ रुपये किरण यांनी मुख्यमंत्री सहायता  निधीला दिले आहे . नुकतेच अंबरनाथचे तहसीलदार जयराज देशमुख यांची भेट घेऊन त्यांनी या रकमेचा धनादेश तहसीलदारांकडे सुपूर्द केला आहे . त्याचप्रमाणे तहसीलदारांना भारतीय संविधानाची उद्देशिका भेट म्हणून दिली. दरम्यान, किरण भालेराव यांनी विवाह सोहळ्यातुन वाचलेल्या खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता  निधीसाठी देऊन सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल बदलापूरतील सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी किरणचे कौतुक केले आहे.

संबंधित पोस्ट