वनपाल शशिकांत शिलवंत सुवर्ण पदकाचे मानकरी, बदलापूरकरांकडून अभिनंदनाचा वर्षाव .
- by Rameshwar Gawai
- Dec 29, 2020
- 779 views
बदलापूर(प्रतिनिधी) : बदलापूरातील रहिवासी असलेले वनपाल शशिकांत शिलवंत वन व महसूल विभागाच्या वतीने उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्यात येणाऱ्या सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले आहेत. याबद्दल बदलापूरकरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वन संपत्ती व वन्यजीव संरक्षण- संवर्धना साठी प्रभावीपणे काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी वन व महसूल विभागाच्या वतीने त्यांना सुवर्ण पदके व रजत पदके प्रदान करून गौरविण्यात येते. वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील राज्य स्तरीय समितीने यंदा राज्यातील ३० अधिकारी-कर्मचाऱ्यांची या पदकांसाठी निवड केली आहे. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील ७ अधिकारी कर्मचारी असून त्यामध्ये वनपाल शशिकांत शिलवंत यांचाही समावेश आहे. शिलवंत यांना सुवर्ण पदक जाहीर झाले असून याबद्दल ते राहत असलेल्या बेलवली परिसरातील नागरिकांनी त्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. बदलापूरातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनीही त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. सदर पदके ही सन २०१८-१९ मध्ये वनसंपदेचे संवर्धन-संरक्षण करण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहेत.दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी वा ३१ मार्चला वसुंधरा दिनी या पुरस्कारांचे वितरण होत असते. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्व-भूमीवर सदर पुरस्कार वितरण लांबणीवर पडले असून परिस्थिती पाहून याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम