बेलवली स्मशानभूमीला मिळावा पर्यायी रस्ता.

बदलापूर(प्रतिनिधी):बदलापूर पश्चिमेकडील बेलवली येथील स्मशानभूमीला पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपा ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष गणेश भोपी यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात कार्यवाही न झाल्यास ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेल,असा इशाराही त्यांनी दिला आहे.

शनिवारी  गणेश भोपी यांनी बदलापूरच्या रेल्वे स्टेशन मास्तरांना दिलेल्या निवेदनाद्वारे हा इशारा दिला आहे. बेलवली परिसरासाठी बेलवली रेल्वे फाटकाजवळील पूर्वेकडे असणारी एकच स्मशानभूमी आहे. मागील सुमारे १०० वर्षापासून बेलवली परिसरातील नागरिक या स्मशानभूमीचा वापर करीत आहेत. या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी बेलवलीतुन पूर्व भागात जाणारा रेल्वे रुळाखालील सबवे आणि रेल्वे फाटकातून रेल्वे रूळ ओलांडून जाणे हे दोनच पर्याय या भागातील नागरिकांना आहेत. रेल्वे रुळाखालून जाणाऱ्या सबवेमध्ये बारमाही पाणी साचत असल्याने तो तसा फारसा उपयोगाचा नाही. त्यात रेल्वे प्रशासनाने रेल्वे रुळांच्या बाजूने भिंत उभारण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी जाणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची स्थानिकांची मागणी आहे. त्यामुळे  शनिवारी  बदलापूर स्टेशन मास्तरांची भेट घेऊन त्यांना भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने 

देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे ग्रामस्थांची अडचण लक्षात आणून देण्यात आल्याचे गणेश भोपी यांनी सांगितले. पर्यायी रस्ता उपलब्ध करून न दिल्यास ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागणार असल्याचा इशाराही देण्यात आला असल्याचे भोपी यांनी स्पष्ट केले.दरम्यान, शिवसेना शाखाप्रमुख शिवाजी कराळे व ग्रामस्थांच्या वतीनेही अशाच प्रकारचे निवेदन देण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट