चार वर्षांच्या पाठपुराव्यानंतर मुस्लिम बांधवांना मिळाली कब्रस्तानसाठी पर्यायी जागा .
- by Rameshwar Gawai
- Dec 21, 2020
- 548 views
बदलापूर(प्रतिनिधी) : सुमारे चार वर्षाच्या पाठपुराव्यानंतर वांगणीतील मुस्लिम समाजाला कब्रस्तानसाठी जागा उपलब्ध झाली आहे. वांगणीतील गट नं. २७८ ही २० गुंठे जागा हीगा दफनभूमीसाठी देण्यात आली आहे. त्यामुळे वांगणीतील मुस्लिम बांधवांची दफनभूमी अभावी होत असलेली गैरसोय टळणार असून याबद्दल वांगणी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद शेलार यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.
वांगणी येथील गट क्रमांक ६३ ही जागा मुस्लिम धर्मीय कब्रस्तानसाठी वापरात होते. सन २०१२ च्या सुमारास ठाणे शिळफाटा खोपोली या महामार्गाचे रुंदीकरण करताना एमएमआरडीएने ही जागा संपादित केली. ही जागा संपादित करताना तत्कालीन तहसीलदारांनी दफनभूमीसाठी तात्काळ दुसरी जागा देण्याचे आश्वासन दिले होते. मुस्लिम बांधवांची दफनभूमी अभावी होत असलेली गैरसोय लक्षात घेता वांगणी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांमध्ये व मासिक सभांमध्येही शासनाने तत्काळ जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही दफन भूमीसाठी जागा उपलब्ध न झाल्याने वांगणीतील मुस्लिम धर्मियांना दफन भूमीच्या जागेच्या बदल्यात पर्यायी जागा देण्यात यावी या मागणीसाठी वांगणी ग्रामपंचायतचे सदस्य प्रमोद शेलार यांनी ७ नोव्हेम्बर २०१६ रोजी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यांनतर तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदारांना जागेसंदर्भात चौकशी करून दफनभूमीच्या जागेबाबतचा परिपूर्ण अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तहसीलदार कार्यालयाकडून कब्रस्तानकरीता जमीन उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडे पाठवण्यात आला होता. यासंदर्भात महिन्याभरात कारवाई होणे अपेक्षित असल्याची माहिती तत्कालीन तहसीलदार प्रशांत जोशी यांनी पत्राद्वारे प्रमोद शेलार यांना दिली होती. तर तहसीलदार यांनी उपोषण मागे घेण्याबाबत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन शेलार यांनी हे आंदोलन स्थगित केले होते. मात्र त्यानंतरही ही जागा हस्तांतरित झाली नव्हती. त्यामुळे यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा सुरू होता.अखेर तब्बल चार वर्षांनी या पाठपुराव्याला यश येऊन मुस्लिम कब्रस्तानसाठी जागा उपलब्ध झाल्याचे प्रमोद शेलार यांनी सांगितले.
मुस्लिम जमात ट्रस्ट अध्यक्ष अशपाक शेख, वकील खान, तफिल शेख, जहुर शेख, सईद गाजी, निजाम शेख,वांगणी ग्रामपंचायत सरपंच केतकी किशोर शेलार,शिवसेना शहरप्रमुख प्रसाद परब यांनी देखील दफनभूमीच्या जागेसाठी महत्वाची भूमिका बजावली आहे.आरपीआय सेक्युलरचे अध्यक्ष श्याम गायकवाड, कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे तत्कालीन नगरसेवक मसूद कोहारी, माजी जिल्हा परिषद सदस्य भानुदास शेलार, योगेश नातू, योगेश विजय शेलार, यासीर बुबेरे,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मनोहर शेलार आदींनी कब्रस्तान जागेच्या मागणीसाठी पाठिंबा दिला होता असेही शेलार यांनी सांगितले.
मुस्लिम कब्रस्तानकरिता जमीन मिळाली असली तरी अजूनही भूमी अभिलेख विभागाकडून सदर जमिनीचे सर्वेक्षण करणे, जमिनीभोवती संरक्षक भिंत बांधणे, पाणी व विजेची सोय करणे, जमीन खोदून तेथे मऊ मातीचा भराव टाकणे, महत्त्वाचे म्हणजे राज्य महामार्ग क्र.७६ ते कब्रस्तान जागेपर्यंत किमान २० फुटाचा रस्ता विकास आराखड्यात मंजूर करून घेणे इत्यादी कामे अद्याप शिल्लक असल्याचे प्रमोद शेलार यांनी सांगितले.

रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम