वसई:उपनिबंधक सहकारी संस्था व दुय्यम निबंधक-वर्ग २ कारभाराची "एसीबी" चौकशीची राज्यपालांकडे मागणी
- by Reporter
- Dec 20, 2020
- 1004 views
विरार(प्रतिनिधी) - दुय्यम निबंधक वर्ग२-वसई यांच्याकडून मुद्रांक शुल्क वसूल करताना सादर होणाऱ्या दस्ताची सक्षमपणे छाननी न करता खोटया दस्ताने,अनधिकृत बांधकामा ठिकाणचे मुद्रांक शुल्क वसूल करण्याचे तसेच उपनिबंधक सहकारी संस्था,वसई यांच्याकडून खोटया दस्ताने हौसिंग सोसायटया नोंद करण्याचे,एकाच क्रमांकाने दोन ठिकाणी हौसिंग सोसायटी नोंदणी करण्याचे प्रयत्न होत असल्याने सर्वसामान्यांची मोठ्या प्रमाणात दिशाभूल व फसवणूक होत असून भविष्यात सदनिका धारकांना विनाकारण कायदेशीर बाबींचा सामना करावा लागण्याची,निवारा गमावून बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे भविष्यातील धोके लक्षात घेता शासकीय यंत्रणेकडून होत असलेल्या बेजबाबदार कामकाजाची "एसीबी" सारख्या सक्षम तपास यंत्रणेकडून चौकशी व्हावी अशी मागणी मा.राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे काही स्थानिकानी एका निवेदनाद्वारे केल्याचे समजते.
विशेष म्हणजे गृहनिर्माण सोसायटी महासंघ (जिल्हा हौसिंग फेडरेशन) कोणत्याही कागदपत्रांची सक्षमपणे पुर्नतपासणी न करता खोटया व अनधिकृत बांधकाम ठिकाणी बेकायदापणे नोंद झालेल्या हौसिंग सोसायटयांना महासंघाचे सभासदत्व कसे काय देते हा संशोधनाचा विषय आहे. तर दुसरीकडे दी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसारखी सहकारी बँकही अशा सोसायटयांना भाग भांंडवल प्रमाणपत्रे प्रदान करते तर काही वित्तीय बँका गृहकर्ज, पंतप्रधान आवास अनुदान देण्याचे सोपस्कार करताना दिसतात.तर काही बँका बोगसरित्या नोदिंत सोसायटयांची बचत खाती सत्य माहिती ज्ञात असताही चालवितात हा एक महाघोटाळा होत आहे.
रिपोर्टर