चाकूचा धाक दाखवून दांपत्याला लुटणाऱ्या त्रिकुटापैकी दोघे गजाआड

अंबरनाथ(प्रतिनिधी) : चाकूचा धाक दाखवून दाम्पत्याला लुटणाऱ्या त्रिकुटापैकी दोघांच्या मुसक्या आवळण्यात शिवाजी नगर पोलिसांना यश आले आहे. कोणतेही धागेदोरे नसताना गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून पोलिसांनी या दोघांना शिताफीने अटक केली असून फरार असलेल्या त्यांच्या साथीदाराचा पोलीस कसून शोध घेत आहेत. 

राहुल पडवळ(२७) व संजय पथवे (३६) अशी या दोघांची नावे असून दोघेही भिवंडी येथे राहणारे आहेत. भिवंडीतील चावीन्द्रा गाव परिसरात सापळा रचून पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्याकडून दोन धारदार चाकू, सोन्याचे मंगळसूत्र व कानातील डुल तसेच गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली रिक्षा असा ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यातही पोलिसांना यश आले आहे राहुल,संजय व त्यांच्या एका साथीदाराने १७  नोव्हेंबरच्या मध्यरात्री अबरनाथच्या बोहनोली गावाच्या मागे आनंद नगर एमआयडीसी परिसरात मोकळ्या जागेत झोपडीत राहणाऱ्या देवकीबाई काबंडी (५०) व त्यांचे पती बाळू काबंडी (५५) यांच्या झोपडीत प्रवेश केला. त्यापैकी एकाने चाकूचा धाक दाखवून देवकीबाई यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व कानातील डुल जबरीने खेचून नेले. यामध्ये प्रतिकार करताना चाकू हातात पकडल्याने देवकीबाई यांच्या हाताला कापले होते. तर दोघांनी बाळू यांना फरफटत झोपडी बाहेर नेऊन त्यांच्या गळ्यावर व दोन्ही हाताच्या तळहातावर चाकूने वार केले होते.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरीष्ठ पोलीस निरीक्षक भोगे यांनी स्वतः या प्रकरणाचा तपास हाती घेतला. आणि कोणतेही धागेदोरे नसताना यातील दोघांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. पोलीस उपनिरीक्षक सुहास पाटील, . पो.हवा.बबन पाटील, पो.ना चंद्रकांत सावंत, संजय गायकवाड, अनिल पाटील, अभिजित राजपूत, प्रमोद घोडके,विनोद मौळे, किरण फड,जितू गोडबोले, नंदू साळुंखे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

संबंधित पोस्ट