बदलापुरात पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड .

बदलापूर(प्रतिनिधी) : कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयाबद्दल भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने नगर परिषद प्रशासनाचे आभार मानले आहेत. 

कोरोना काळात कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना यंदा १५ हजार रुपयांचा बोनस जाहीर करण्यात यावा, अशी मागणी भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या वतीने करण्यात आली होती. यासंदर्भात कामगार कर्मचारी महासंघाचे सेक्रेटरी लक्ष्मण कुडव, नगर परिषद युनिट उपाध्यक्ष दत्तात्रय पाचंगे,सदस्य दीपक जाधव आदींची एक बैठक झाली होती. या बैठकीत कर्मचाऱ्यांना बोनस देण्याबाबत प्रशासन सकारात्मक असल्याचे चर्चेतून दिसून आले. तसेच लवकरच याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकाऱ्यानी आश्वासन दिले होते. त्यानुसार नगर परिषद कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले असल्याची माहिती लक्ष्मण कुडव यांनी दिली आहे.

संबंधित पोस्ट