बीएसएनएलच्या सेवेत सुधारणा होण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंना निवेदन.

बदलापूर(प्रतिनिधी) : बदलापूर जवळील बारवी डॅम परिसरातील ग्रामीण भागात सातत्याने खंडित होत असलेल्या बीएसएनएल सेवेचा फटका स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे या नागरिकांची गैरसोय दूर  व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना निवेदन सादर केले आहे.

गुरुवारी  हे निवेदन सादर करण्यात आले असून स्थानिक नागरिकांची बीएसएनएल सेवे अभावी होत असलेली गैरसोय दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले असल्याची माहिती कालिदास देशमुख यांनी दिली.

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील बारवी डॅम परिसरात जवळपास १० ते १२ गावे तसेच आदिवासी पाडे आहेत. जवळ पास बारा हजार ते पंधरा हजार लोकसंख्या ह्या संपूर्ण परिसरात वास्तव्यास आहे. हा भाग भौगोलिक दृष्ट्या उंच सखल , मध्यम उंचीचा डोंगराळ आहे. बारवी धरण हे ठाणे जिल्ह्यातील अनेक शहरे आणि औद्योगिक क्षेत्रांना पाणी पुरवठा करणारे अतिशय महत्वाचे धरण आहे. धरण व परिसर हिरवाईने बहरलेला असल्याने तसेच रेल्वे स्टेशनपासून जवळ असल्याने पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. ह्याच विभागातून मुरबाड व बदलापूर शहरांना जोडणारा रस्ता जातो. अंबरनाथ बदलापूर, पनवेल, मुंबई, नवी मुंबई, जुन्नर,अहमदनगर कडे येणारी जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. थोडक्यात परिसराचे महत्व अनन्य साधारण आहे. मात्र असे असूनही ह्या परिसरात बीएसएनएल शिवाय कोणतेही खासगी मोबाईल नेटवर्क नाही.  त्यातही बीएसएनएल मोबाईल सेवा सातत्याने खंडित होत असते. महिनाभरात केवळ १० ते १५ दिवसच मोबाईल सेवा सुरू असते. बारवी डॅम जवळच्या असलेल्या या भागात पावसाळ्यात पुरसदृश्य स्थिती नेहमी उदभवते वर्दळीचा रस्ता असल्याने छोटे मोठे अपघात नेहमी होत असतात आपत्कालीन परिस्थितीत बदलापूर मुरबाडला जाऊन मोबाईलचा वापर करावा लागतो.वर्क फ्रॉम होम करणाऱ्या नागरिकांना तसेच सध्या ऑनलाईन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली असल्याचे कालिदास देशमुख यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट