मराठी विक्रेत्यांच्या पाठिशी उभी राहणार मनसे.

बदलापूर(प्रतिनिधी) : बदलापुरात फळे-भाजीपाला तसेच खाद्यपदार्थ व इतर विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांच्या हाती आता मनसेचा झेंडा दिसु लागला आहे. मराठी विक्रेत्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे सांगून मराठी विक्रेत्यांना त्रास झाल्यास मनसे उत्तर देईल असा इशाराही मनसे महिला शहराध्यक्ष संगिता चेंदवनकर यांनी दिला आहे. 

लॉकडाऊन काळात अनेक खाजगी कार्यालये, कंपन्या आदी ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. काहींना कमी पगारात काम करावे लागत आहे. अशा परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी असे अनेक लोक किरकोळ फळे-भाजीपाला व इतर किरकोळ वस्तूंची  विक्री करत आहेत. रेल्वे लोकल सेवा पूर्ववत सुरू झाल्यानंतर यापैकी जवळपास निम्म्याहून अधिक लोक पुन्हा नोकरीवर जाऊ शकतील. त्यामुळे तोपर्यंत या लोकांना हातगाडीवर वा टोपल्या घेऊन शहरात विक्री करण्याची परवानगी मिळावी, अशी आपली भूमिका असल्याचे संगिता चेंदवनकर यांनी सांगितले

नगरपरिषदेचे अतिक्रमण विरोधी पथक अशा गरीब विक्रेऱ्यांवर कारवाई करते, मात्र काही धनदांडग्यांच्या अतिक्रमणाकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते,असा आरोपही त्यांनी केला. कोणत्याही विक्रेत्याने विक्री करताना रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना तसेच पादचाऱ्यांना अडथळा होणार नाही, याची काळजी घ्यावी,असे आवाहनही संगिता चेंदवनकर यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट