अंबरनाथमधील विविध पक्षाच्या नेत्यांनी राष्ट्रवादीत केला जाहीर प्रवेश.

अंबरनाथबद्दल बरच ऐकले होते, पण सदामामांनी ते सर्व खोट ठरवलं - गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड.

अंबरनाथ(प्रतिनिधी):अंबरनाथबद्दल बरच ऐकले होते. पण सदामामांनी ते सर्व खोट ठरवलं आहे ही गोष्ट खरी आहे. "जेव्हा पक्षाची पडझड चालू होती, तेव्हा कोण जाणार, कोण राहणार" याबाबत अनेकांच्या मनात किन्तु परन्तु होते. परंतु, सदामामांनी एकतर्फी अंबरनाथला सांभाळले आहे. त्यामुळे  आज आपली परिस्थिती बरी दिसते. सत्ता आल्यानंतर सत्ता परिवर्तनाचे लाभ मिळतात. हे लाभ आपल्याला मिळायला सुरुवात झाली आहे. असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अंबरनाथ येथे आयोजित आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना सांगितले. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंबरनाथ शहराच्या वतीने नुकतीच आढावा बैठक" अंबरनाथ पूर्वेकडील रोटरी सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव (मामा) पाटील व युवक जिल्हाध्यक्ष सचिन सदाशिव पाटील यांनी केले होते. या बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, ठाणे जिल्हा शहराध्यक्ष आनंद परांजपे, जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे, महिला जिल्हाध्यक्षा विद्याताई वेखंडे उपस्थित होते. जितेंद्र आव्हाड हे गृहनिर्माणमंत्री झाल्यानंतर अंबरनाथमध्ये प्रथमच आल्याने त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस अंबरनाथ शहराच्या वतीने  सदाशिव पाटील व सचिन पाटील यांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार केला. दरम्यान माजी नगरसेवक कबीर गायकवाड, वृषाली पाटील, भाजपाचे ॲड कृष्णा रसाळ पाटील, अशोक महाडिक, मनिषा भालचंद्र भोईर, नासिर कुंजाळी, मनसेचे वॉर्ड अध्यक्ष विकास बांगडे, काँग्रेसचे रोहित सिंग यांच्यासह अनेकांचा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याहस्ते राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश घेण्यात आला.

या कार्यक्रमाला अंबरनाथ शहराध्यक्ष तथा आयोजक सदाशिव (मामा) पाटील, युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, प्रदेश सरचिटणीस सुभाष पिसाळ, महेश तपासे, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. इनामुद्दीन कुरेशी, विधानसभा अध्यक्ष पुष्पराज गायकवाड, महिला अंबरनाथ शहराध्यक्ष पूनम शेलार, समाजसेविका आशा पाटील, अश्विनी पाटील, प्रिसीला डिसेल्वा , युवक अध्यक्ष प्रमोद बोराडे, युवती अध्यक्ष ऐश्वर्या मोटे, बळीराम साबे, कमलाकर सुर्यवंशी, आशुतोष पाटील, मिलिंद मोरे, सचिन अहिरकर, भगवान महाजन यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.


एकेकाळी अंबरनाथ विमको कंपनी (काडीपेटी) च्या नावाने प्रसिद्ध होते. पण गेल्या काही वर्षांमध्ये बट्याबोळ  झाला. ज्या अंबरनाथ एमआयडीसीमध्ये अनेक कारखाने होते. त्यामधून निम्म्याहून अधिक कारखाने बंद झालेत.  नवीन जो कामगार कायदा आलाय. तो तर एवढा जीवघेणा आहे. ज्या कंपनीमध्ये ३०० हुन कमी कामगार आहेत, तो कंपनी मालक कोणालाही न सांगता कुठल्याही मिनिटाला कंपनी बंद करू शकतो. हे सर्व कायदे एकमेकांचे जीव घेणारे कायदे आहेत आणि याला प्रचंड पणाने विरोध केला पाहिजे. आज नोकरी नाही, नोटबंदीनंतर जी काही परिस्थिती झाली. त्या परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. 

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रापुढे दोन संकटे आहेत, त्यात एक म्हणजे कोरोनाचे आणि दुसरे पावसाचे. एवढा पाऊस पडला की, उभी पिके वाहून गेली, जमिनीच्या जमिनी वाहून गेल्यात. त्याकरिता त्यांना महाराष्ट्र सरकारने १० हजार कोटींची मदत जाहीर केली व दिवाळीच्या अगोदर त्यांना ही मदत मिळाली पाहिजे असा निर्णय घेतला आहे. हे सरकार चांगल्या पद्धतीने काम करीत असून गोरगरिबांना घर देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. त्या माध्यमातून जमिनी शोधून अल्प दरामध्ये परवडतील अशी घरे देण्याचे काम आम्ही करणार आहोत. असेही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. 

महाविकास आघाडीने एकत्र लढावे ही माझी इच्छा आहे. परंतु, काय होईल सांगता येत नाही. म्हणून गाफील न राहता स्वबळावर लढन्याची  तयारी ठेवा. येणारा काळ हा अवघड असेल, मैत्री होईल की नाही सांगता येत नाही. तरी स्वबळावर लढण्याची तयारी आहे व ठेवा. आयत्या वेळेस घात होणार नाही. यांची काळजी घ्या असेही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले..

संबंधित पोस्ट