वांगणी-बदलापूर -कल्याण बससेवा सुरू.
शिवसेनेच्या मुरबाड विधानसभा संपर्कप्रमुखांनी मानले पालकमंत्र्यांचे आभार.
- by Rameshwar Gawai
- Oct 30, 2020
- 1141 views
बदलापूर(प्रतिनिधी) : वांगणी ते कल्याण दरम्यान बससेवा सुरू करण्यात आली आहे. कल्याण -डोंबिवली महानगरपालिका परिवहन सेवेच्या या बसमधून वांगणीहुन कल्याणला अवघ्या ३० रुपयांत तर बदलापूरला १० रुपयांत पोहचणे शक्य होणार आहे. या बससेवेमुळे वांगणी ते कल्याण दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची बससेवेअभावी होत असलेली मोठी गैरसोय टळण्याची चिन्हे आहेत.
गुरुवारी वांगणी-कल्याण बस सेवेचा वांगणी बाजारपेठेत शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे मुरबाड विधानसभा संपर्क प्रमुख नरेंद्र शेलार, ठाणे ग्रामीण उपजिल्हाप्रमुख एकनाथ शेलार, माजी उपसरपंच किशोर शेलार, शिवसेना शहरप्रमुख प्रसाद परब,रवी गोडांबे, मुन्ना बुबेरे, इरफान बुबेरे आदी उपस्थित होते. यानिमित्ताने वांगणीहुन कल्याणला रवाना झालेल्या बसच्या चालकांचा व वाहकांचा सत्कारही करण्यात आला. सध्या सुरुवातीला दररोज सकाळी ७ वा. वांगणीहुन बस कल्याणला रवाना होणार आहे. तर संध्याकाळी ७ वा. बस कल्याणहून वांगणीला पोहचणार आहे. पहिल्याच दिवशी या बससेवेला चांगला प्रतिसाद मिळाला असून हा प्रतिसाद पाहता बससेवेच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे आगामी काळात बसच्या फेऱ्या वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नरेंद्र शेलार यांनी सांगितले. वांगणी-कल्याण बससेवा सुरू करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील व बदलापूरचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांचेही नरेंद्र शेलार यांनी आभार मानले आहेत.
असे असतील थांबे:
वांगणी- कल्याण बससेवेला वांगणी, ढवळे पाडा, गोरेगाव, कासगाव, चामटोली, बदलापूरातील खरवई व गांधीचौक असे थांबे असणार आहेत. बदलापूर पर्यंतच्या प्रवासासाठी १० रुपये प्रवासी भाडे आकारले जाणार आहेत. तर कल्याणपर्यंतच्या प्रवासासाठी ३० रुपये प्रवासी भाडे आकारले जाणार आहे.

रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम