अंबरनाथ मनसे शहर उपाध्यक्षांची हत्या: चार हल्लेखोर गजाआड .

अंबरनाथ(प्रतिनिधी) : अंबरनाथ येथिल  मनसेचे शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांची हत्या करून पसार झालेल्या हल्लेखोरांपैकी चार जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. 

बुधवारी सायंकाळी ६ वा च्या सुमारास अंबरनाथ गांव आणि पाले गांव यांच्या मध्यावर नव्याने विकासीत झालेल्या जैनम रेसिडेन्सी सोसायटी परिसरात राकेश पाटील यांची हत्या करण्यात आली. अज्ञात हल्लेखोरांनी आपसात संगनमत करून धारदार शस्त्राने हल्ला करून या ठिकाणी आलेल्या राकेश पाटील यांची हत्या  केली. हत्येनंतर ते सर्वजण आपल्या कारने पसार झाले. त्यापैकी चारजण हत्येसाठी  वापरण्यात आलेल्या कारमधून मुरबाडच्या दिशेने जात असताना पोलिसांनी त्यांना अटक केली. विनायक पिल्ले, अक्तर खान, विजय दासी आणि रमेश दासी यांचा त्यामध्ये समावेश आहे. दरम्यान राकेश पाटील यांचा भाऊ अजय पाटील याच्या फिर्यादीवरून राकेश पाटील यांच्या हत्येप्रकरणी डी.मोहन,विनायक पिल्ले, अक्तर खान, विजय,दासी,राजू दासी, रमेश दोहार व इतर २ ते ३ जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार असलेल्या इतरांचा पोलीस शोध घेत आहेत. जैनम रेसिडेन्सी या सोसायटीच्या ग्रीलच्या कामावरून झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आले असल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर गुन्हा दाखल झालेल्यांपैकी डी मोहन हा अंबरनाथमधील एका बड्या बांधकाम व्यवसायिकाचा हस्तक आहे. त्यामुळे या हत्येमागे या बांधकाम व्यवसायिकाचा काही हात आहे का? याचाही पोलीस तपास करित आहेत.

संबंधित पोस्ट