शरद पवारांनी केलेल्या कौतूकाने भारावले चित्रकार सचिन जुवाटकर.

बदलापूर(प्रतिनिधी) :  "खुपच आनंद होत आहे..... आभाळाएवढा मोठा माणूस, खरंतर ज्यांना पाहुन अनेक दिग्गज हात जोडून उभे राहतात... पण समोर आपलं स्वतःचं चित्र पाहतो आणि कलेसाठी हा थोर माणुस उभा राहतो हेच या मोठ्या माणसाला ' जाणता राजा ' का म्हणतात ते ठाम पणे सिद्ध करते... अशा शब्दात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या कौतुकामुळे भारावून गेलो असल्याची भावना बदलापुरातील ख्यातनाम चित्रकार सचिन जुवाटकर यांनी व्यक्त केली.

बदलापूर येथील प्रसिद्ध चित्रकार सचिन जुवाटकर यांच्या "सचिन जुवाटकर कलादालना"च्या  द्वितीय वर्धापन दिनाचे औचित्य साधून "लक्ष्य कोरोनाचे, शस्त्र कुंचल्याचे" या मालिकेत  चित्रकार सचिन जुवाटकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे फेसबुक लाईव्ह द्वारे सलग आठ तासात चित्र साकारले होते. १४ जून २०२० रोजी हे चित्र साकारले होते. फेसबुक लाईव्ह असलेल्या कार्यक्रमाला शेकडो कला रसिकांनी दाद दिली होती. सदरचे चित्र शरद पवार यांना  अलीकडेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यालयात भेट देण्यात आले. त्यावेळी शरद पवार यांनी केलेल्या कौतुकाने सचिन जुवाटकर अतिशय भारावून गेले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख हे यावेळी उपस्थित  होते. 

" एवढे व्हीवर्स झाले...खुप सुंदर...चांगलं ओपेक केलं,असे म्हणत शरद पवार यांनी जुवाटकरांचे कौतुक केल त्यांनी एका व्यक्तीला हे चित्र आधी खाली एका फ्लोअरवर नेण्यासाठी सांगितले होते पण...त्या व्यक्तीने चित्र उचलता उचलता त्यांनी " थांब गाडीत ठेव घरी नेऊ..असे सांगितले. तसेच  स्वतः परवानगी देत चेहऱ्या वरील मास्क खाली सरकवत " ये फोटो काढ " म्हणत जवळ बोलावले...मला चार पाच वेळा बसण्या साठी सांगितले...पण एवढ्या मोठ्या थोर माणसा समोर  मला ते जमत नव्हते...असे सचिन जुवाटकर यांनी सांगितले.

शरद पवारांनी कला क्षेत्रात वरदान ठरेल अशी मोठी कामगिरी केली. ' नेहरू सेंटर ' सारखं आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलादालन ते ' द बाँबे आर्ट सोसायटी' यांचे हक्काचे कलादालन असे अनेक उपक्रम प्रत्यक्षात साकारले. " आर्ट फ्युजन ' सारखे ग्रृप शो  राबवले. या आणि  यासारख्या अनेक कलेसाठीची त्यांची दिव्य कामगिरी मनात होती. म्हणूनच त्यांना मानवंदना देण्यासाठी  कोरोना संकटकाळी ' लक्ष्य कोरोनाचे, शस्त्र कुंचल्याचे ' या संकल्पनेवर आधारित लाईव पोर्टरेट साकारले असल्याचे प्रसिद्ध चित्रकार सचिन जुवाटकर यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट