परिपूर्ण आरोग्य सेवेसाठी सुविधा उपलब्ध करून देणार-कुंदन पाटील यांचे आश्वासन.
- by Rameshwar Gawai
- Oct 18, 2020
- 1237 views
बदलापूर(प्रतिनिधी) : अंबरनाथ तालुक्यातील नागरिकांना परिपूर्ण आरोग्य सेवा मिळावी यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन ठाणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समिती सभापती कुंदन पाटील यांनी दिले.
अंबरनाथ तालुक्यातील आरोग्यसेवेचा आढावा घेण्यासाठी कुंदन पाटील यांनी नुकतेच तालुक्यातील ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना भेटी देऊन आरोग्य सेवा देताना येत असलेल्या अडचणींची माहिती घेतली. त्याचप्रमाणे मूलभूत सुविधांबाबतची सद्यस्थिती जाणून घेऊन परिपूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. या दौऱ्याच्या समारोप प्रसंगी वांगणीतील श्री ज्ञानेश्वर मंगल कार्यालयात कुंदन पाटील यांचे स्वागत करण्यात आले. कोरोनाच्या संकट काळात "माझे कुटुंब माझी जबाबदारी'" या अभियानांतर्गत प्रत्येकाने स्वतः सह आपल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी पाटील यांनी केले. तर या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची संधी दिल्याबद्दल आयोजक प्रमोद शेलार यांनी कुंदन पाटील यांचे आभार मानले.
कोरोना योद्ध्यांचा सत्कार .
कोरोनाच्या संकट काळात स्वतः चा जीव धोक्यात घालून नागरिकांना मदत मिळावी म्हणून प्रयत्न केल्याबद्दल वांगणी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच किशोर शेलार, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर शेलार, डोणे ग्रामपंचायत माजी उपसरपंच व सदस्य दीपक कुडके, मोतीराम निरगुडा,वांगणी ग्रामपंचायतीचे सफाई कामगार प्रमुख बाळाराम गवळी आदींचा कुंदन पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम