बदलापूरात बांधकाम व्यवसायाला कोरोनाचा फटका विकास अधिभार व इतर कर टप्प्याटप्प्याने भरण्याची मुभा द्या- आमदारांची मागणी

बदलापूर(प्रतिनिधी):  इतर उद्योग-व्यवसाया प्रमाणे बांधकाम व्यवसायालाही कोरोनाचा फटका बसला आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायिकांना यातून सावरण्यासाठी विकास अधिभार व इतर चार्जेस भरण्यासाठी मुभा मिळावी,अशी मागणी आमदार किसन कथोरे यांनी केली आहे. 

कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे प्रशासक जगतसिंग गिरासे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे आमदार कथोरे यांनी ही मागणी केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच क्षेत्रात आर्थिक मंदी आली आहे. बदलापूर शहरातील बांधकाम व्यवसायिकांनाही या मंदीचा सामना करावा लागत आहे. या आर्थिक मंदीतून सावरण्यासाठी ठाणे, कल्याण-डोंबिवली व नाशिक आदी महापालिकांनी बांधकाम व्यवसायिकांना विकास अधिभार व इतर चार्जेस टप्प्या-टप्प्याने भरण्याची मुभा देण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या महापूर, अवेळी झालेला पाऊस व नंतर कोरोनाचा प्रादुर्भाव याचा मोठा फटका बदलापूरातील बांधकाम व्यवसायाला बसला आहे. त्यामुळे डबघाईला आलेल्या बांधकाम व्यवसायाला दिलासा देण्याची मागणी बांधकाम व्यवसायिकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर अन्य महापालिकां प्रमाणे कुळगाव बदलापूर नगर परिषद प्रशासनानेही बांधकाम व्यवसायिकांना विकास अधिभार व इतर चार्जेस टप्प्याटप्प्याने भरण्याची मुभा द्यावी,अशी मागणी आमदार किसन कथोरे यांनी केली आहे.

संबंधित पोस्ट