बदलापुरात अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरू.
- by Rameshwar Gawai
- Oct 13, 2020
- 810 views
बदलापूर(प्रतिनिधी) : कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने अखेर रहदारीस अडथळा ठरत असलेल्या अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईची चाहूल लागल्याने रस्त्यावर व इतरत्र ठाण मांडून बसलेल्या फेरीवाल्यांनी काढता पाय घेतला. तर दुकानासमोरील फुटपाथ आंदणच आहे अशा पध्दतीने दुकानासमोरच्या फुटपाथवर सामान मांडणाऱ्या दुकानदारांनीही फुटपाथ मोकळे केले.
सोमवारी कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाचे अमित सरमळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरक्षा रक्षकांच्या बंदोबस्तात बदलापूर पूर्व व पश्चिम भागात रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या फळ, भाजी व इतर विक्रेत्यांवर तसेच दुकानासमोरील फुटपाथवर दुकानातील सामान ठेवून अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांवरही कारवाईची मोहीम हाती घेतली. हे पथक पायी फिरत कारवाई करीत होते. कात्रप नवीन डीपी रोड परिसरात हे पथक फिरत असताना हे पथक येत असल्याची चाहूल लागताच रस्त्यावर बसलेल्या विक्रेत्यांनी स्वतःहून टोपल्या व इतर सामान हलविण्यास सुरुवात केली. अनेक दुकानदार दुकानासमोरील फुटपाथ आपल्याच मालकीचा आहे अशा अविर्भावात दुकानातील सामानाच्या गोण्या, फलक व इतर साहित्य मांडून ठेवतात. पथकाची चाहूल लागताच अशा दुकानदारांची एकच तारांबळ उडाली. दुकानदार घाईघाईने हे साहित्य काढून घेताना दिसत होते. लॉकडाऊन काळात अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई थंडावली होती. त्यामुळे बदलापूर शहराच्या भागाभागात रस्त्याच्या बाजूला मिळेल त्या जागेवर विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. काही ठिकाणी फेरीवाल्यांनी ठाण मांडल्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे.तर काही ठिकाणी दुकानदारांचे दुकानातील सामान थेट फुटपाथवर आले आहे. त्यामुळे निदान वाहनांना रहदारीस व पादचाऱ्यांना चालताना अडथळा येऊ नये याची नगर परिषद प्रशासनाने काळजी घ्यावी,अशी माफक अपेक्षा शहरातील सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहेत. दरम्यान, अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई यापुढेही सुरुच रहाणार असल्याचे सरमळकर यांनी सांगितले.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम