वांगणी परिसरातील बिबट्याच्या शोधात वनविभाग .
- by Rameshwar Gawai
- Oct 11, 2020
- 1000 views
बदलापूर(प्रतिनिधी) :सुमारे पंधरवड्यापूर्वी वांगणीतील कडवपाडा परिसरात बिबट्या आढळून आल्याने खळबळ उडाली होती. मात्र काही दिवसांपासून हा बिबट्या आढळून येत नसल्याने हा बिबट्या गेला तरी कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर बिबट्या आजूबाजूच्या गावात शिरू नये, यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणीही स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
वांगणीतील कडवपाडा परिसरात बिबट्या आढळून आल्याची माहिती स्थानिकांनी वनविभागाला दिली होती. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने याठिकाणी जाऊन पाहणी केली होती. त्याचप्रमाणे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र अद्याप या बिबट्याचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे नागरीकां मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर बिबट्याचा शोध घेण्यासाठी वनविभागाने ठिकठिकाणी ट्रेसिंग कॅमेरे बसविणे, पिंजरे बसविणे तसेच २४ तास रेंजरची गस्त ठेवून ठोस उपाय योजना कराव्यात, अशी मागणी शिवसेनेचे मुरबाड विधानसभा संपर्क प्रमुख नरेंद्र शेलार यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर बदलापूरचे वनक्षेत्रपाल प्रमोद ठाकर यांच्याशी संपर्क साधला असता वनविभागाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या असल्याचे स्पष्ट केले. ज्या ठिकाणी बिबट्या आढळून आला होता. तो परिसर घनदाट जंगलाचा असून आताच नव्हे तर वर्षानुवर्षे अनेकदा याठिकाणी बिबट्या आढळून येत होता, असे या परिसरातील नागरिक सांगत आहेत. सुमारे १५ दिवसांपूर्वी या परिसरात बिबट्या आढळून आल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितल्यानंतर नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत जनजागृती करण्यात आली आहे. या परिसरात हॅलोजन लाईट्स बसविण्यात आल्या असून वनविभागाचे पथक सातत्याने गस्त घालीत आहे. त्याशिवाय इतर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र आतापर्यंत या परिसरात बिबट्या आढळून आला नसल्याची माहिती वनक्षेत्रपाल प्रमोद ठाकर यांनी दिली.
बिबट्याने मार्ग बदलला?
बिबट्याची वास घेण्याची क्षमता प्रचंड असते. त्यामुळे तो डोंगरावर असला तरी डोंगर पायथ्याजवळ कोंबड्या, मेंढ्या आदी खाद्य असल्यास त्याला ते समजते.आणि तो भक्ष्याच्या जवळ येतो. भक्ष्य मिळाल्यास तो दोन चार दिवस त्या भागात थांबतो. नाहीतर तो आपला मार्ग बदलतो. गेल्या पंधरा दिवसांपासून या भागात बिबट्या आढळून आला नसल्याने त्याने आपला मार्ग बदलला असावा, असा आमचा अंदाज असल्याचेही प्रमोद ठाकर यांनी स्पष्ट केले.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम