साताऱ्यातील कोविड हॉस्पिटलचे उद्घाटन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी,मास्क, हात धुणे, अंतर राखणे या त्रिसूत्रीचा वापर करा -- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
▪ सातारा जिल्ह्यासाठी 45.59 कोटी निधी दिल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
- by Adarsh Maharashtra
- Oct 09, 2020
- 1377 views
सातारा दि. ९ ( जिल्हा माहिती कार्यालय ) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने उभे असलेल्या संग्रहालयात कोविड हॉस्पिटल उभारुन त्यांच्या विचारांनाच अभिप्रेत असलेले कार्य आपण करत आहोत हे निश्चितच अभिमानास्पद आहे. या ठिकाणी उत्तम सुविधा आहेत. त्याद्वारे कोविड बाधितांना उत्तम आरोग्य देण्यासाठी प्रयत्नात रहा. इथून पुढे लस कधी का येईना आपण कोविड प्रादुर्भाव रोखणाऱ्या मास्क, हातधुणे आणि अंतर राखणे या त्रिसूत्रीचा वापर करून आपल्याला या प्रादुर्भावापासून दूर ठेवूया असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले.
सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात उभारलेल्या कोविड हॉस्पिटलच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी श्री. ठाकरे बोलत होते. यावेळी पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयातून उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार सर्वश्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, मकरंद पाटील, दिपक चव्हाण, महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, कोविड हॉस्पिटल उभारणीत मदत करणाऱ्या संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
अवघ्या 20 दिवसात अतिशय चांगल्या सुविधा असलेले कोविड हॉस्पिटल उभे केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे कौतुक करून जगभरातील देशात लाट ओसरली म्हणता म्हणता कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट आल्याचे उदाहरण असल्यामुळे आपल्याला अधिक सजग राहून काम करावे लागेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम आपण लोकांना या प्रादुर्भावापासून दूर ठेवण्यासाठी राबवत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने उभे असलेल्या संग्रहालयात रयतेच्या आरोग्य सेवेसाठी काम होणार आहे. जिल्ह्यात एक सुसज्ज कोविड हॉस्पिटल असावे अशी सर्वांचीच इच्छा होती त्या इच्छेची पूर्ती होत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. यावेळी जंबो कोविड हॉस्पिटल उभे केल्यानंतर जबाबदारीही तेवढीच मोठी असल्याचे
श्री. पवार यांनी सांगितले. लोकप्रतिनिधी, प्रशासन या कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अविरत प्रयत्न करीत असल्याचा नामोल्लेख करून खाजगी हॉस्पिटलच्या एक लाखाच्या पुढच्या बिलाचे ऑडिट करावे, त्यावर लक्ष ठेवून रहावे अशा सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. पुणे विभागाला कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करायच्या उपाययोजनेसाठी 151 कोटी दिले असून पाच जिल्ह्यांपैकी सातारा जिल्ह्याला 45.59 कोटी रुपये दिल्याची घोषणाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केली.
विविध साथीच्या रोगांबरोबर आपण रहायला शिकलो तशीच काळजी घेऊन कोरोना बरोबर राहू या, लस येईल तेव्हा येईल, आपण हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या पाळून यावर विजय मिळवू, असा विश्वास विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्ती केला.
हॉस्पिटल सुरु होईल, सर्व साधनांची पूर्तता पण होईल पण डॉक्टर आणि नर्सेस यांची सेवा अधिक गतीने होण्याची गरज असून मृत्यूदर कमी करण्याबरोबर अधिकाधिक ट्रेसिंग करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी केले. कृष्णा मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये अजून ऑक्सिजनचे बेड वाढू शकतात, त्या संस्थेला सांगून ती क्षमता जिल्ह्यासाठी महत्वाची ठरेल असेही श्री. टोपे यांनी यावेळी सांगितले.
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कोविड हॉस्पिटल उभे करण्यासाठी शासनाने अतिशय तत्परतेने मदत केल्याचे सांगून गेल्या पाच महिन्यातील अनुभव लक्षात घेऊन हे हॉस्पिटल उभे केले. इथे डायलेसिसच्या व्यवस्थेचे चार बेडही उपलब्ध करून देण्यात आल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोविड हॉस्पिटल उभे करण्यासाठी तत्परतेने परवानगी दिली. जिल्हाधिकारी आणि त्यांच्या टीमने अतिशय कमी काळात सुसज्ज असे हॉस्पिटल उभे केल्याचे सांगून गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा प्रशासनाच्या कामाचे कौतुक केले.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोविड हॉस्पिटल उभारणी, तेथील सुविधा, त्यासाठी लागलेला निधी याची सविस्तर माहिती दिली. कोविड हॉस्पिटलवर बनवलेली चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली.
यावेळी हे हॉस्पिटल उभे करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील आणि बाहेरील संस्था आणि व्यक्ती यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा याठिकाणी गौरव करण्यात आला. अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी आभार मानले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम