राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादाने,बदलापूरात ढाब्यांवर रंगतायत मद्यपार्ट्या.

कोरोना संसर्ग वाढण्याची व्यक्त होतेय भीती.

बदलापूर(प्रतिनिधी):  कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी शासन हरतऱ्हेचे प्रयत्न करीत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुर्लक्षामुळे शहरात कोरोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. बदलापूर परिसरात बहुतांश  ढाब्यांवर मद्यपार्ट्या रंगत आहेत. मद्यविक्री परवाना नसताना सुरू असलेल्या या मद्यपार्ट्या मुळे  शासनाचा महसूल तर बुडतच आहे. त्याचबरोबर कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

बदलापुर परिसरातील काही ढाबे एके काळी बदलापूरच नव्हे तर आजूबाजूच्या शहरातील मांसाहारी खवय्यांची खास पसंती होते. परंतु अलीकडे अनेक ढाब्यांवर  मद्यविक्री होत असल्याने या  ढाब्याना "ढाबा कम बार" असे स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे. बदलापुरात बदलापुरगाव, मांजरली, एरंजाड,कात्रप तसेच वांगणी रोड परिसरात अनेक लहान-मोठे ढाबे सुरु आहेत. यातील बहुतांश  ढाबे मद्यपींच्या गर्दीने फुलून गेलेले पाहायला मिळतात. ढाब्यांवर अशा प्रकारे विनापरवाना मद्यविक्री होत आहे. याठिकाणी होत असलेल्या विना परवाना मद्य विक्रीमुळे शासनाचा मोठा  महसूल बुडत आहे. त्याठिकाणी बनावट मद्यविक्री होण्याचा वा त्यातून एखाद्याच्या जिविताचे बरेवाईट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर विनापरवाना मद्यविक्री रोखणे ही राज्य उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी आहे. परंतु राज्य उत्पादन शुल्क विभाग सातत्याने याकडे डोळेझाक करीत आले आहे. ढाबेवाल्यांशी असलेल्या अर्थपूर्ण संबंधामुळेच हा सगळा कारभार सुरू असल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे सध्या कोरोना महामारीच्या काळातही यात खंड पडलेला नाही. कोरोना महामारीच्या काळातही ढाब्यांवर राजरोसपणे सुरू असलेल्या या  मद्यपार्ट्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. 

एकीकडे राज्य शासन कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व प्रयत्न करीत आहे. गर्दी टाळण्यासाठी शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल देणाऱ्या हॉटेल, बार रेस्टॉरंट यांनाही अनेक नियम घालून दिले आहेत. असे असताना राज्य उत्पादन शुल्क मात्र ढाब्यांवर सुरू असलेल्या मद्यपार्ट्यांकडे दुर्लक्ष करीत आहे.त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धती विषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. त्यामुळे याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी बदलापूर परिसरात छापे टाकून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या या रॅकेटचा पर्दाफाश करावा, अशी मागणी शहरातील सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहेत.

संबंधित पोस्ट