अंबरनाथकरांना १० ऑक्टोबरपासून चिखलोली धरणातून होणार पाणीपुरवठा .

अंबरनाथ(प्रतिनिधी) : अंबरनाथकरांना १० ऑक्टोबर पासून चिखलोली धरणातून पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून देण्यात आले आहे. पाणीटंचाईमुळे नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेता तातडीने पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास मनसेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. 

अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणारे चिखलोली धरण पूर्णपणे भरलेले असतानाही या धरणातून अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा केला जात नव्हता. धरणाचे पाणी प्रदूषित झाल्यामुळे मागील वर्षी  राज्यमंत्र्यांच्या आदेशानंतर हा पाणीपुरवठा थांबवण्यात आला होता. पर्यायी व्यवस्था म्हणून एमआयडीसीकडून अंबरनाथ शहराला पाणी मिळत असले, तरी ते पुरेसे नसल्याने अंबरनाथ शहराच्या पूर्व भागाला प्रामुख्याने मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने १८ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत चिखलोली धरणातून पाणीपुरवठा सुरू झाल्यास अंबरनाथकरांना पुरेसे पाणी मिळेल, या हेतूने चिखलोली धरणातून पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली होती. यासाठी १५ दिवसांचा अल्टीमेटम देऊन त्यानंतर धरणात आंदोलनाचा इशारा मनसेने दिला होता? याची दखल घेत चिखलोली धरणातून होणारा पाणीपुरवठा पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने घेतला आहे. मात्र अनेक महिन्यांपासून चिखलोली धरणावरील जलशुद्धीकरण प्रकल्प बंद असल्याने डागडुजीची गरज असून त्याला आणखी ४ ते ५ दिवस लागणार आहेत. त्यामुळे १० ऑक्टोबरपासून चिखलोली धरणातून होणारा पाणीपुरवठा पुन्हा एकदा सुरू करण्याचे आश्वासन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिले असल्याची माहिती मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी दिली आहे.,

संबंधित पोस्ट