माझे कुटुंब माझी जबाबदारी'मोहिमेला बदलापूरकरांचा सकारात्मक प्रतिसाद .

पहिल्या फेरीत ६८ टक्के गृहभेटी २ लाख नागरिकांची आरोग्य तपासणी .

बदलापूर(रामेश्वर गवई) : 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेला बदलापूरकरांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या  मोहिमेंतर्गत नगर परिषदेच्या आरोग्य पथकाने पहिल्या फेरीत आतापर्यंत ६८ टक्के घरांना भेटी दिल्या असून २ लाखाहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये ३०६५ लक्षणे आढळलेले व कोमॉबिड रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर डॉक्टरांच्या पथकाने  ट्रॅक, ट्रेस व ट्रिट या त्रिसूत्रीचा वापर करून उपचार सुरु केले आहेत. 

कुळगाव बदलापूर नगर परिषद क्षेत्रात शासनाच्या आदेशानुसार १५ सप्टेम्बर पासून 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. या अंतर्गत नगर परिषदेची ११३ आरोग्य पथके घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याची तपासणी तसेच माहिती घेण्याचे काम करीत आहेत.  आशा सेविका, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा स्वयंसेवक, लोकप्रतिनिधी , समाजसेवक, नगर परिषदेचे शिक्षक, कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या कै. दुबे रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी, स्टाफ नर्सेस, एम. एस . डब्ल्यू. व डॉक्टर्स यांचा समावेश आहे. गेल्या २० दिवसांपासून हे पथक नागरिकांच्या आरोग्य तपासणी बरोबरच आजारी व्यक्तींना उपचार व आरोग्य शिक्षणही देत आहे. या २० दिवसांच्या मोहिमेमध्ये १५ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान एकूण १२२७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे. १५ सप्टेंबर २०२० रोजी मृत्युदर १. ४१ टक्के होता तो ४ ऑक्टोबर २०२० पर्यंत १.२० टक्के एवढा झाला असल्याची माहिती कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या पूर्व विभागाचे नोडल ऑफिसर विलास जडये यांनी दिली आहे. 

नगर परिषदेच्या कै. दुबे रुग्णालयात २४ तास फिवर ओपीडी सुरु आहे. तसेच होम आयसोलेशन रुग्णांकरिता २४ तास डॉक्टरांचे पथक नेमण्यात आले आहे. सोनीवली क्वारंटाईन सेंटर, अँटीजेन टेस्ट,गौरी हॉल येथे कोविड रुग्णालय मोफत सुरु आहे. नगर परिषदेच्या कुळगाव शाळेतही २२ सप्टेंबर पासून मोफत अँट्रीजेन टेस्ट सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत ९५० नागरिकांनी मोफत अँटीजेन टेस्ट तपासणी सुविधेचा लाभ घेतला आहे. नागरिकांमध्ये या मोहिमेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली असल्याने नागरिकांचेही सहकार्य मिळत असून त्यामुळे मृत्युदर कमी होण्यास मदत झाली असल्याचेही विलास जडये यांनी सांगितले

संबंधित पोस्ट