बदलापूर-मुरबाड रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण रस्ते दुरूस्तीकडे एमआयडीसीचे दुर्लक्ष .
- by Rameshwar Gawai
- Oct 06, 2020
- 688 views
बदलापूर(प्रतिनिधी) : बदलापूर शहरातून बारवी आणि मुरबाडकडे जाणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या रस्त्याची पूर्णतः चाळण झाली आहे.त्यामुळे वालीवली, वडवली, एरंजाड, मुळगाव आदी गावातील नागरीकांसह या ठिकाणी नव्याने उभ्या राहत असलेल्या गृहसंकुलातील हजारो नागरीकांना रोज खड्ड्यातूनच प्रवास करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणात वाहतुक असलेल्या या महत्त्वाच्या रस्त्याच्या दुरूस्तीबाबत एमआयडीसी प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
बदलापूर शहरातील आणि नगरपालिकेच्या हद्दीत येणारे सर्वच रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रीटी करण केले आहे. त्यामुळे बदलापूर शहर डांबरमुक्त आणि खड्डेमुक्त झाल्याच्या वल्गना वारंवार लोकप्रतिनिधी करत असतात. मात्र बदलापूर शहरातूनच बारवी आणि मुरबाड कडे जाणाऱ्या रस्त्याची यंदाच्या पावसात मोठी दुरवस्था झाली आहे. वडवली भागातून पुढे वालीवली, एरंजाड, राहटोली, मुळगाव ते पुढे बारवी तसेच बारवी ते मुरबाड या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या गावांमध्ये जाणारा बदलापूरपासून हा एकमेव जवळचा रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. वडवलीपासून एरंजाडपर्यंतच्या परिसरात अनेक नवीन गृह प्रकल्प उभे राहत आहेत. वाढत्या लोकवस्तीमुळे नागरीकांची आणि वाहनांची वर्दळही वाढत आहे. हे कमी की काय या मुख्य रस्त्यांवर अवजड वाहनांची वर्दळही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजवले नसल्याने वाहनचालक खड्डे वाचवन्याचा प्रयत्न करत असतात. त्यातच अपघात वाढत आहेत. गणेशोत्सवापूर्वी या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी नागरीकाकडून करण्यात आली होती. मात्र अजूनही या रस्त्याची दुरवस्था कायम आहे.
बदलापूर बारवी या मार्गावरील वालीवली येथील पुलावरून अवजड वाहनांसाठी वाहतुकीस बंदी करण्यात आली आहे. तशा आशयाचा फलकही या पुलावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लावण्यात आला आहे. मात्र त्यानंतरही वालीवलीच्या पुलावरून दिवसरात्र अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. बंदीचा फलक लावला असला तरी त्याचे पालन होत आहे का नाही याची तजवीज यंत्रणांना करणे गजेचे वाटत नसल्याने पुल कोसळून अपघात झाल्यावरच यंत्रणांना जाग येणार का असा प्रश्न वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे. तर एमआयडीसी प्रशासनाने या रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रीटी करणाचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठवला होता. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण थांबवले होते. मात्र सिमेंट कॉंक्रीटकरणाचा प्रस्ताव अद्याप मंजूर झाला नाही. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात येणार असल्याचे एमआयडीसीच्या एका अधिकार्यांनी सांगितले आहे.
पूर्वी चांगल्या असलेल्या या रस्त्याची अवजड वाहनांची वर्दळ प्रचंड वाढल्याने दुर्दशा झाली असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले. वालीवली येथील कमकुवत पूल तातडीने नवीन बांधण्यात यावा तसेच या रस्त्यावरील खड्डे न भरता संपूर्ण रस्ता नवीन करण्यात यावा अशी मागणी आपण उद्योगमंत्री तसेच एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली असल्याचेही कथोरे यांनी सांगितले. वास्तविक हा रस्ता रुंद करून सिमेंट काँक्रीटचा करण्याचा प्रस्ताव आपण सादर केला आहे मात्र तो प्रस्ताव अद्याप मंजूर केला नसल्याचेही त्यांनी सांगितले.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम