बदलापूर बाजारपेठेत फेरीवाले, दुकानदार संघर्ष,व्यापाऱ्यांनी दिला बंदचा इशारा.

बदलापूर(प्रतिनिधी) : लॉकडाऊन काळात नागरिकांना सुविधा व्हावी या उद्देशाने बदलापूर शहराच्या मध्यवर्ती भागात भाजीपाला विक्रेत्यांना बसण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र अनलॉक सुरू झाल्यानंतरही बाजारपेठ परिसरातील फेरीवाले जागा सोडायला तयार नाहीत. त्यावरून आता व्यापारी व फेरीवाले असा संघर्ष होऊ लागल्याचे चित्र बदलापूरात दिसू लागले आहे. 

बदलापूर शहराच्या पश्चिम भागात मुख्य बाजारपेठ असून येथे भाजी मंडई सुद्धा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून गर्दी टाळण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने शहरातील

भाजी मंडई बंद ठेवल्या होत्या. फळ व भाजी विक्रेत्यांना एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवून शहरातील मोकळे रस्ते आणि चौकात बसण्याची मुभा दिली होती. लॉकडाऊन काळात अनेक नव्या भाजी, फळ विक्रेत्यांची यात भर पडली. आता लॉकडाऊन संपून अनलॉक सुरू झाल्याने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे स्थानिक, बाजारपेठ परिसरात गजबज वाढली आहे. त्यात लॉकडाऊन काळात  रस्त्यावर बसलेले फेरीवालेही तिथेच आहेत.वाहतुकीला याचा अडथळा होत आहे. काही फेरीवाल्यांच्या पूर्वी एकदोन असलेल्या टोपल्या आता सात-आठ वर गेल्या आहेत. त्यामुळे दुकानात येणाऱ्या ग्राहकांना त्रास होत असून स्वतःच्या दुकानात व्यवसाय करणे कठीण झाले आहे, अशी भावना शहरातील व्यापारी व्यक्त करत आहे. गेल्या आठवड्यात अशाच एका फेरीवाल्याला हटकले असता त्याने थेट दुकानदारावर धावत जाऊन शिवीगाळ आणि दमदाटी केली. त्यामुळे दुकांदारांमध्ये संतापाचे वातावरण असून अशा हेकेखोर फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. अंबरनाथ तालुक्यातील आदिवासी, शेतकरी हे  यापूर्वीही व्यवसाय करत होते मात्र त्यांनी दुकानदारांना कधी त्रास दिली नव्हता. मात्र आता फेरीवाले शिरजोर होऊ लागले असून त्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी आम्ही कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि प्रशासकांना केली असल्याचे बाजारपेठ व्यापारी जनसेवा मित्र मंडळाचे सचिव श्रीराम चुंबळे यांनी  

सांगितले आहे . काही दिवसांपूर्वी रिक्षा स्टॅन्डच्या जागेच्या मुद्द्यावर फेरीवाले आणि रिक्षा चालक समोरासमोर आले होते. त्यामुळे याप्रकरणी आता तातडीने तोडगा काढावा, अन्यथा १ ऑक्टोबरला बाजारपेठ बंद ठेऊ असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे. याबाबत नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी यांच्याशी संपर्क साधला  असता, लवकरच संयुक्त बैठक घेऊन करून यावर तोडगा काढला जाईल, असे त्यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट