समझोता की धूळफेक?
- by Adarsh Maharashtra
- Sep 28, 2020
- 424 views
राजकारणात कुणीही कायमचा मित्र अथवा कायमचा शत्रू नसतो निवडणूक प्रचारात दिवसभर एकमेकांच्या शंभर पिढ्यांचा उद्धार करणारे संध्याकाळी एकत्र बसून दारू पीत असतात आणि हेच राजकारणातले जळजळीत वास्तव लोकांना कळत नाही. लोक विनाकारण भावनेच्या भरात एखाद्या पक्षाच्या किंवा नेत्याच्या मागे वाहवत जातात त्यांच्या नादाला लागून एकमेकांची डोकी फोडतात पण ते मात्र कधीना कधी एकत्र येतात आणि एकमेकांची डोकी फोडणारे अंगावर केसेस घेऊन कोर्टाच्या चकरा मारीत असतात. हे सगळं एवढ्यासाठी सांगायचं आहे की गेल्या विधानसभा निवडणुकीच्या नंतर शिवसेना भाजपा मध्ये जो काही तमाशा झाला तो संपूर्ण देशाने पाहिला आणि या तमाशाचा सूत्रधार होता संजय राऊत! याच माणसामुळे सेना भाजपच्या २३ वर्षाच्या दोस्तीची वाट लागली आणि त्यानंतर सेना भाजप मध्ये भारत पाक सारखी परिस्थिती निर्माण झाली. दोन्हीकडचे नेते रोज एकमेकांचे कपडे फाडत होते सामनाने तर जणू काही भाजपा संपवण्याची सुपारीच घेतली होती आणि सामना कसा आणि किती वाईट आहे हे सांगताना फडणवीस टॉमेटो सारखे लालबुंद होत होते आणि आज त्याच सामनासाठी म्हणे फडणवीस मुलाखत देणार आहेत आणि संजय राऊत त्यांची मुलाखत घेणार आहेत आणि याचा अर्थ गेल्या आठ महिन्यात जे झालं गेलं ते गंगेला मिळालं असं दोन्हीकडच्या लोकांनी ठरवलेलं दिसतंय मात्र दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना हे मान्य आहे का? ज्यांना पक्षाच्या स्वाभिमाना पेक्षा सत्ता महत्वाची वाटते त्यांना कदाचित हे मान्य होईल पण पक्ष टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी ज्यांनी दिवस रात्र एक केला त्या दोन्हीकडच्या निष्ठावंतांना हे मान्य आहे का? कारण शेवटी निवडणुका नेत्यांच्या बळावर नाही तर कार्यकर्त्यांच्या बळावर लढवल्या जातात आणि जिंकल्या जातात कारण प्रचारासाठी कार्यकर्ता दारोदारी जात असतो. उद्या जर सेना भाजपची युती झाली आणि युतीचा प्रचार करायला कार्यकर्ता दारोदारी गेला आणि एखाद्याने पायातला जोडा काढून त्याला विचारले की एकमेकांची आय बहीण काढून आता एकत्र का आलात ? तर त्याने काय उत्तर द्यायचे? वरच्या लोकांना काय त्यांनी सत्तेसाठी सगळी लाज शरम सोडलेली असते पण जो सर्वसामान्य कार्यकर्ता असतो तो इज्जतदार असतो त्याला लोकांमध्ये आपला विश्वास कायम ठेवायचा असतो आणि पक्षाची ध्येय धोरणं लोकांमध्ये पोहचवून पक्षाला जनाधार मिळवून द्यायचा असतो त्यामुळे वरच्यांनी सेटलमेंट केली की खालच्या कार्यकर्त्याची मोठी गोची होते. आता गेल्या आठ महिन्यांपासून एकमेकांच्या पोटावर बसणारे आता निर्लज्ज बनून एकमेकांच्या मुलाखती घेणार असतील तर अशा गाठी भेटींना समझोता म्हणायचा की ही सुद्धा लोकांच्या डोळ्यात धूळफेक आहे असे समजायचे. आम्हाला आश्चर्य वाटते ते विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे! काय समजून ते सामनाला मुलाखत द्यायला तयार झाले. ज्यांनी मोदी पासून फडणवीस यांच्या पर्यंत कुणाचीही बाकी ठेवली नाही त्यात तुमचे विचार तुम्ही कसे काय मांडू शकता आणि जरी तिथे तुमचे विचार मांडले तरी मागच्या ८ महिन्यातल्या चिखल फेकी बद्दल मुलाखत घेणाऱ्याला जाब विचारणार आहात का?आणि तो तुमच्या प्रश्नाला खरोखरच उत्तर देऊ शकेल का? सेना भाजपा एकत्र आले काय आणि नाही आले काय याच्याशी महाराष्ट्राला काहीच घेणे देणे नाही फक्त समझोता झाल्यावर भाजपवाल्यांनी त्यांच्या अंगावरचे सेनेने जे कपडे फाडले आहेत तेवढे तरी शिवून लोकांसमोर यावे एवढंच लोकांचं म्हणणं आहे. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे त्यामुळे राष्ट्रीय पक्षाची त्यांच्या नेत्यांची जनतेच्या नजरेत एक वेगळी इमेज असते आणि ती इमेज जपता आली तरच तुम्ही लोकांसमोर उजळ माथ्याने आणि ताठ मानेने जाऊ शकता मात्र ज्यांनी सत्ते साठी कंगनाच्या सँडल खाल्ल्या आहेत त्यांच्याकडून महाराष्ट्राला कोणतीही अपेक्षा नाही कारण त्यांच्यातला मराठी बाणा कधीच मेला आहे मात्र एवढं सगळ होऊनही या मुलाखतीद्वारे समझोता एक्स्प्रेस खरोखरच पुन्हा रुळावर धावणार असेल तर दोघांनाही जनतेच्या काही प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतील त्यातील पहिला प्रश्न म्हणजे ही खरोखरच समझोता करण्याच्या दृष्टीने प्रामाणिक वाटचाल आहे की महाविकास आघाडीतील काँग्रेसला घाबरवण्यासाठी जनतेच्या डोळ्यात केलेली धूळफेक आते हे अगोदर सांगून टाकावे तरच सेना भाजपच्या या नव्या वग नाट्याला रंगत येईल.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम