अंबरनाथ येथिल छाया रुग्णालय डॉक्टर व कर्मचाऱ्या अभावी व्हेंटिलेटरवर .

अंबरनाथ(प्रतिनिधी)  :  अंबरनाथ तालुका व आजूबाजूच्या ग्रामीण परिसरासाठी असलेल्या छाया रुग्णालयात केवळ २  डॉक्टर व जेमतेम ६  कर्मचारी उपलब्ध आहेत. त्यामुळे अपुरे मनुष्यबळ आणि साधनसामग्री बरोबर उपलब्ध डॉक्टर व कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.  आणि लोकांच्या रोषाला ही  सामोरे जावे लागत आहे.  

अंबरनाथ येथे शासकीय रुग्णालय असलेल्या छाया रुग्णालयात अधिक्षक डॉ शशिकांत डोडे व डॉ सचिन देशमुख हे दोनच डॉक्टर उपलब्ध आहेत , शासनाकडे ७ वैद्यकीय अधिकाऱ्यांची वारंवार  मागणी केल्यानंतर शासनाने डॉ सुनील घाटकर, डॉ शुभांगी वडेकर, डॉ सचिन देशमुख, डॉ योगेश पाल, डॉ विक्रांत गुजर या ५वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती.  मात्र काही महिन्यांपूर्वी डॉ शुभांगी वडेकर यांची कोव्हीड -१९  रुग्णालय अंबरनाथ, योगेश पाल यांची जिल्हा रुग्णालय ठाणे, विक्रांत गुजर यांची मुरबाड ग्रामीण रुग्णालय येथे बदली करण्यात आली आहे . तर डॉ सुनिल घाटकर हे स्वतः आजारी असून ते उपचार घेत आहेत. 

५०  वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले छाया रुग्णालय गेल्या २८  वर्षांपासून व्हेंटिलेटरवर आहे. डॉक्टर्स, नर्स ,कर्मचारी यांची कमतरता, रुग्णालयातील कॉम्प्युटर्स बंद आहेत,  शस्त्रक्रियागृह, शवविच्छेदनगृह  रुग्णवाहिका ,जीर्ण झालेली धोकादायक इमारत अशा अनेक समस्यांकडे राज्यशासन अंबरनाथ नगरपालिका दुर्लक्ष करीत असल्याने सर्वसामान्य व गोरगरीब नागरिक आरोग्य सुविधांपासून वंचित आहे . 

अशा परिस्थितीत पुरुष  वार्ड, महिला  वार्ड, आयसोलेशन  वार्ड, मॅटरनिटी वार्ड, इम्युलायझेशन, ओपीडी , कॅज्युलटी वार्ड  हे सर्व विभाग दोन डॉक्टर्स व ६  कर्मचारी यांना बघावा लागत आहे . 

चतुर्थ श्रेणीचा एकही कर्मचारी उपलब्ध नसल्याने डॉक्टर्स, नर्सेस व कर्मचाऱ्यांना त्यांची कामे करावी लागत आहेत . त्यामुळे  कामाचा अतिरिक्त भार त्यांच्यावर पडतो, अपुऱ्या व्यवस्थेमुळे लोकांच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत तर  त्यांचा रोष सांभाळावा लागतो , अशा परिस्थितीत आमची शारीरिक व मानसिकरित्या दमछाक होते अशी प्रतिक्रिया एका कर्मचाऱ्याने दिली आहे .    

या संदर्भात ठाणे येथिल जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक   डॉ कैलास पवार यांना विचारले असता ते म्हणाले की छाया रुग्णालयात पुरेसे डॉक्टर्स आहेत मात्र कोव्हीड - १९  च्या परिस्थिती मुळे काही डॉक्टर्सची बदली करण्यात आली आहे.  मात्र बदलापूर येथून नुकतीच एका डॉक्टरची नियुक्ती छाया रुग्णालयात केली आहे, चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती लवकरात लवकर केली जाईल .

संबंधित पोस्ट