
नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्कायवॉकची दुरावस्था.
- by Rameshwar Gawai
- Sep 23, 2020
- 592 views
बदलापूर(प्रतिनिधी):गेल्या काही महिन्यां पासून नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बदलापूरतील स्कायवॉकची दुरावस्था झाली आहे. नियमित साफसफाई होत नसल्याने स्कायवॉकवर घाणीचे साम्राज्य पसरले असताना आता स्कायवॉकच्या फायबर आवरणाची पडझडही सुरू झाली आहे त्यामुळे नागरिकांची होत असलेली गैरसोय व संभाव्य दुर्घटनेची शक्यता लक्षात घेता नगर परिषद प्रशासनाने तातडीने स्कायवॉकची डागडुजी करण्याची मागणी शहरातील सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहेत.
बदलापूर रेल्वे स्थानकालगत शहराच्या पूर्व पश्चिम भागात स्कायवॉकची उभारणी करण्यात आली आहे. पूर्वी शहराच्या पूर्व पश्चिम भागात ये-जा करण्यासाठी नागरिकांची होत असलेली गैरसोय या स्कायवॉकमुळे दूर झाली आहे. बदलापुरात दररोज हजारो चाकरमानी नोकरी व्यवसाया निमित्त रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे सकाळी कामावर जाण्याच्या व संध्याकाळी कामावरुन येण्याच्या वेळी चाकरमानी या स्कायवॉकवरून रेल्वे फलाटावर जातात. तसेच कामावरून परतण्याच्या वेळीही या स्कायवॉकचा वापर करतात. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने या स्कायवॉकची स्वच्छता तसेच डागडुजीकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून स्कायवॉकच्या स्वच्छतेकडे नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे स्कायवॉकवर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. भटक्या कुत्र्यांचा स्कायवॉकवर मुक्त संचार सुरू आहे. काही ठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्याही पडलेल्या आहेत. स्कायवॉकवरील दिव्यांच्या बाबतीतही सावळा गोंधळ आहे. पूर्व भागात स्कायवॉकवर रात्रंदिवस दिवे सुरू आहेत. तर पश्चिम भागात पोलीस चौकी ते एसटी बस स्टँड पर्यंत दिवे बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी पश्चिम भागात स्कायवॉकवरून जाताना नागरिकांची गैरसोय होत आहे. इतकेच नव्हे तर काही दिवसांपूर्वी पूर्व भागातील स्कायवॉकच्या एका भागावरील फायबरचे आवरण तुटून पडले आहे. सुदैवानं यात कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. मात्र ज्या ठिकाणी हे फायबर आवरण तुटून पडले आहे. त्याखाली टेम्पो स्टँड आहे. त्याशिवाय बाजूलाच पूर्व भागातील स्कायवॉकवर जाण्याचा रस्ताही आहे. अनेक भाजी व फळ विक्रेतेही इथे बसलेले असून हा रस्ता रहदारीचा आहे. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आता तरी नगर परिषद प्रशासनाने तातडीने या स्कायवॉकची डागडुजी करण्याची व दिव्यांची व्यवस्था सुरळीत करण्याची तसेच नियमित स्वच्छतेची व्यवस्था करण्याची मागणी शहरातील सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम