ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन

सातारा : ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन झाले असून साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटल येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर गेले चार दिवस उपचार सुरू होते. आई माझी काळूबाई या सिरियलचे शुटिंग सुरू असताना त्यांना लागण झाली होती. आशालता वाबगावकर यांच्याव्यतिरिक्त सेटवरील इतर 27 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

गेले चार दिवस आशालता वाबगावकर यांच्यावर साताऱ्यात उपचार सुरू होते. मालिकेच्या सेटवर त्यांना कोरोनाची लागण झाली होती. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. जवळपास 40 हून अधिक वर्षांसाठी त्या रंगभूमी, सिनेमा आणि मालिकांमधून काम करत होत्या. तसेच नाट्यसंगीतामधूनही त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.आशालता या मूळच्या गोव्याच्या असून, त्यांनी कोकणी आणि मराठी चित्रपटांच्या माध्यमातून अभिनयाला सुरुवात केली.

त्यांनी आत्तापर्यंत मराठी आणि हिंदी अशा सुमारे 100 हून अधिक चित्रपटांमधून काम केले आहे. 'गुंतता हृदय हे, रायगडाला जेव्हा जाग येते, चिन्ना आणि महानंदा’ यामध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. संगीत नाटक मत्स्यगंधाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या नाटकातील कारर्कीदीस सुरुवात केली. तर बासू चटर्जी यांच्या 'अपने पराये'या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. याच चित्रपटातील सहायक अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी त्यांना फिल्म फेअरसाठी उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचे नामांकनही मिळालं होतं. मराठी चित्रपट सृष्टीत 'उंबरठा, सूत्रधार, नवरी मिळे नवऱ्याला, वहिनीची माया, माहेरची साडी' हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते.'आई माझी काळूबाई' ही मालिका लॉकडाऊननंतरच्या काळात सुरू झाली. या मालिकेत प्राजक्ता गायकवाड, अलका कुबल, आशालता वाबगावकर यांच्या मुख्य भूमिका आहे. या मालिकेचा तामझाम मोठा आहे. या मालिकेत गाण्याचं चित्रिकरण चालू होतं. त्यासाठी काही मंडळी मुंबईतून आली होती. साताऱ्याजवळ असलेल्या खानविलकर फार्महाऊसवर या गाण्याचं चित्रिकरण सुरू होतं. तिथेच कोरोनाचा संसर्ग झाला. त्यातून 27 जण कोरोना बाधित झाले.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट