गेल्या वर्ष भरा पासुन फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक .

बदलापूर(प्रतिनिधी) : गेल्या वर्षभरापासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला बदलापूर पश्चिम पोलिसांनी सापळा रचून शिताफीने अटक केली आहे. गणेश दुर्गे (४८) असे त्याचे नाव असून तो बदलापूर पश्चिम भागात राहणारा आहे. त्याच्याकडून गावठी बनावटीचे १ पिस्टल व १ रिव्हॉल्व्हरही पोलिसांनी हस्तगत केले आहे. 

बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे व वरिष्ठ पोलिस निरीक्षक लक्ष्मण सारिपुत्र यांनी ही माहिती दिली. बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात १०/९/२०१९ रोजी गणेश दुर्गे याच्या विरोधात भा. द.वि कलम ३२६, ३२३,५०६ (२) सह शस्त्र अधिनियम ३/२५, म.पो.का. कलम ३७(१)१३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र वारंवार शोध घेऊनही तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता.परंतु १७ सप्टेंबर रोजी तो राहत्या घरी येणार असल्याची गोपनीय माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक सारिपुत्र यांना मिळाली. सारिपुत्र यांनी वरिष्ठाना  याबाबत माहिती देऊन त्यांच्या सहकाऱ्यांना गणेश दुर्गे याला ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार स.पो.नि. ढिकले, पो.हवा सुरंजे, पो.शि. गणेश भारती, गुरव,पादिर, पाटील, म.पो.ना.पाटील, पो.शि. निगडीकर, लोणे आदींनी सापळा रचून गणेश दुर्गे याला राहत्या घरातून अटक केली. गणेश दुर्गे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी एक खुनाचा तसेच दरोड्याचे सात गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल आहेत. पोलिसांनी त्याला अटक केली असून आता फरार असलेल्या कालावधीत त्याने आणखी काही गुन्हे केले आहेत का? याचा पोलीस तपास करणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त नरळे यांनी दिली आहे . पोलीस आयुक्त फणसळकर, सह पोलीस आयुक्त डॉ.मेखला, अप्पर पोलीस आयुक्त कराळे, पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे व सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली बदलापूर पश्चिम पोलिसांनी ही कारवाई केली.

संबंधित पोस्ट