कोरोनाचा फटका रिक्षा व्यवसायाला .

सहा महिन्यांच्या कर्जमाफी, करमाफीसह मिळावी आर्थिक मदत: रिक्षा युनियनची मागणी .

अंबरनाथ (प्रतिनिधी) :  रिक्षा व्यवसायाला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आर्थिक संकटात आलेल्या रिक्षा चालकांना दिलासा देण्यासाठी सहा महिन्यांच्या कर्ज माफी -करमाफीसह महाराष्ट्र शासनाने आर्थिक मदत ही जाहीर करावी,अशी मागणी बदलापूर अंबरनाथ चालक मालक रिक्षा युनियनच्या वतीने करण्यात आली आहे.
 
कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात ठप्प झालेला रिक्षा व्यवसाय अनलॉकनंतरही पूर्वपदावर येऊ शकलेला नाही. त्यामुळे रिक्षा चालकांना कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे कठीण झाले आहे. त्यातच आता ज्या रिक्षा चालकांनी लॉकडाउनच्या काळात रिक्षांसाठी बँकांतून कर्ज घेतले होते. त्या बँका कर्जासाठी तगादा लावू लागल्या आहेत. अनेक रिक्षा चालकांच्या पत्नी कुटुंबाला हातभार लावण्यासाठी मायक्रोफायनान्स वा खाजगी बँकांतुन कर्ज घेऊन लहानमोठा व्यवसाय करीत होत्या. त्यांनाही लॉक डाउन काळात रोजगार नसल्याने या कर्जाचे हप्ते भरता आलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्यामागेही मायक्रोफायनांस वा खाजगी बँकांनी कर्जाचे हप्ते भरण्यासाठी तगादा लावला आहे. दुसरीकडे ज्या रिक्षा चालकांचे लायसन्स,परमिट नूतनीकरण, इन्श्युरन्स, पासिंग, रोड टॅक्स नूतनीकरण झालेले नाही अशा रिक्षा चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे रिक्षा चालक पुरते हवालदिल झाले असल्याचे बदलापूर अंबरनाथ चालक मालक रिक्षा युनियनचे जिल्हाध्यक्ष दिलीप सोनकांबळे यांनी सांगितले.

या परिस्थितीत रिक्षा चालकांना दिलासा देण्यासाठी शासनाने, गेल्या सहा महिन्यांपासून कर्जाचे हप्ते न भरू शकलेल्या रिक्षाचालकांचे सहा महिन्यांचे कर्ज व्याजासह माफ करण्याचे आदेश फायनान्स कंपन्या व खाजगी बँकांना द्यावेत,  रिक्षा चालकांचे लायसन्स, परमिट नूतनीकरण, पासिंग फी, इन्श्युरन्स, रोड टॅक्स आदी मोफत करून द्यावीत,वीजबिल, घरपट्टी, पाणी पट्टी माफ करण्यात यावी, त्याचप्रमाणे रिक्षाचालकांना तातडीने प्रत्येकी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, अशी आमची मागणी असल्याचे सोनकांबळे यांनी सांगितले. यासंदर्भात बदलापूर अंबरनाथ चालक मालक रिक्षा युनियनच्या वतीने सोमवारी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित पोस्ट