कोरोना नियंत्रणात अंबरनाथने घडविला इतिहास : डॉ. श्रीकांत शिंदे.

अंबरनाथ(प्रतिनिधी) : कोरोनाचा प्रभाव वाढत असताना अंबरनाथ नगरपालिकेने प्रत्येक टप्प्यात सक्षम यंत्रणा उभारली. त्यामुळे या ठिकाणच्या कोरोनाग्रस्त रुग्णांवर योग्य उपचार करणे शक्य झाले असून कोरोना नियंत्रणाच्या बाबतीत अंबरनाथने ठाणे जिल्ह्यात नवा आदर्श घडविल्याचे मत खा. डॉ.श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले.

अंबरनाथ नगरपालिकेच्या आरोग्य पथकाला पाच रुग्णवाहिका आणि एक व्हेंटिलेटर असलेली रुग्णवाहिका डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेचे गुरुवारी लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना, अंबरनाथ शहराने कोरोनाबधितांवर उपचार करण्यासाठी जी यंत्रणा उभी केली आहे ते कौतुकास्पद असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी या सहा नवीन रुग्णवाहिका उपयुक्त ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चिखलोली स्थानक दोन वर्षात होणार पूर्ण अंबरनाथ आणि बदलापूरच्या मध्ये चिखलोली स्थानकासाठी जागा ताब्यात घेण्याचे काम सुरू असून ते काम पूर्ण झाल्यावर लागलीच निविदा प्रक्रिया करून चिखलोली स्थानक उभारण्याचे काम सुरू होईल असा विश्वास डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला. येत्या दोन वर्षात हे स्थानक अंबरनाथ आणि बदलापूर करांसाठी उपलब्ध होईल असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर, माजी नगराध्यक्षा मनिषा वाळेकर तसेच अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, डॉ.महेश्वरी, डॉ. गणेश राठोड आदी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट