
मराठी विक्रेत्यांसाठी मनसे उतरणार मैदानात
- by Rameshwar Gawai
- Sep 06, 2020
- 1283 views
बदलापूर/ प्रतिनिधी : बदलापुरातील मराठी विक्रेत्यांसाठी आता मनसे मैदानात उतरणार आहे. धंदा-व्यवसाय करणाऱ्या मराठी माणसावर अन्याय झाल्यास मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल असा इशारा मनसेच्या महिला शहराध्यक्षा संगीता चेंदवणकर यांनी दिला आहे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. काहींच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर काहींना कमी पगारात काम करावे लागत आहे. त्यामुळे नाईलाजास्तव या मंडळींना किरकोळ वस्तूंची विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा लागत आहे. त्यासाठी आर्थिक संकटात आलेले अनेक जण रस्त्यांवर टोपल्या घेऊन किंवा हातगाड्या लावून लहानसहान व्यवसाय करीत आहेत. या लोकांना याठिकाणी व्यवसाय करण्यास मज्जाव केला जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत.काही दिवसांपूर्वी एका मासळी विक्रेत्या महिलेच्या बाबतीत असा प्रकार झाला. याबाबत मनसेच्या पदाधिकाऱ्यांना समजताच मनसे शहराध्यक्ष संगीता चेंदवणकर, शाखाध्यक्ष रवी कोळी,सतीश कांबळे, शहर संघटक निशांत मांडवीकर, सचिव प्रशांत अडसूळ, विभागाध्यक्ष संदेश मेढे,विभाग संघटक देवेंद्र पिंगुळकर आदींनी त्या ठिकाणी धाव घेऊन संबंधितांस समज दिली. बदलापूर शहरात यापुढे कुठेही मराठी विक्रेत्यांच्या बाबतीत असा प्रकार होत असल्याचे समजल्यास या अन्यायाला मनसे स्टाईल उत्तर देणार असल्याचे संगीता चेंदवणकर यांनी सांगितले.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम