
अखेर बारवी धरण ओव्हरफ्लो,ठाणे जिल्ह्याचे पाण्याचे टेन्शन संपले
- by Rameshwar Gawai
- Aug 31, 2020
- 1162 views
बदलापूर (प्रतिनिधी) : ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठे असलेले बारवी धरण अखेर पूर्णपणे भरून वाहू लागले असून धरणातून ५४५ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. या धरणातून कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगर पालिका, भिवंडी निजामपूर महानगर पालिका, मीरा भाईंदर महानगर पालिकांसह अंबरनाथ, बदलापूर नगर परिषदसह जिल्ह्यातील सर्व एमआयडीसींना पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे हे धरण ओव्हरफ्लो झाल्याने ठाणे जिल्ह्याचे पाण्याचे टेन्शन संपणार आहे.
बारवी धरणाची उंची गेल्या वर्षी वाढविण्यात आली होती. या धरणावरील स्वयंचलीत ११ दरवाजे २०१९ मध्ये उघडण्यात आले होते . धरणाची उंची चार मिटरने वाढविल्याने या धरणात दुप्पट पाणी साठा निर्माण झाला आहे. २०१९ मध्ये पहिल्यांदाच या धरणात नवीन क्षमतेने पाणी साठा साठविण्यात आला होता. गेल्यवर्षी ४ऑगस्टला हे धरण भरुन वाहू लागले होते. मात्र यंदा जुन आणि जुलै महिन्यात पाऊस कमी झाल्याने धरण भरण्यास विलंब झाला होता. २ ऑगस्टला बारवी धरण हे केवळ ५० टक्केच भरले होते. २ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे मात्र हे धरण रविवारी ९८ टक्क्यांपर्यत भरले होते. दरवर्षी धरण ओव्हरफ्लो होण्याआधी जलपूजन केले जाते. त्याप्रमाणे रविवारी सकाळी आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते बारवी धरणाच्या पाण्याचे पूजन करण्यात आले होते. पावसाचा जोर पाहता काही तासात हे धरण भरून वाहू लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्याप्रमाणे रविवारी रात्री १०. ३० वाजण्याच्या सुमारास हे धरण ओव्हरफ्लो होऊन धरणातून क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. गुरुवारपासून हे धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे सर्वांचेच बारवी धरण पूर्णपणे कधी भरणार याकडे लक्ष लागले होते.
बारवी धरणाची पूर्वीची क्षमता ६८.६० मिटर होती, मागील वर्षी धरणाची उंची ४ मीटरने वाढवण्यात आली असून आता धरणाची उंची ७२.६० मिटर झाली आहे. पूर्वी धरणाची पाणी साठवण क्षमता २३४ दश लक्ष घनमीटर इतकी होती आता हि क्षमता वाढून ३४०.४८ दश लक्ष घनमीटर इतकी झाली आहे. बारवी धरणात सध्या ३३८.८४ दश लक्ष घनमीटर पाण्याचा साठा उपलब्ध आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम