बदलापूरात पालिकेचे कोविड रुग्णालय सुरू झाल्याने नागरिकाना दिलासा .

बदलापूर (प्रतिनिधी) : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेले बदलापूरतील नगर परिषदेमार्फत सुरू  करण्यात आलेले कोविड रुग्णालय अखेर सुरू झाले आहे.लोकार्पणास झालेल्या विलंबामुळे हे रुग्णालय कार्यान्वित केव्हा होणार याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. मात्र नगर परिषद प्रशासनाने युद्धपातळीवर यंत्रणा उभारत रुग्णसेवा देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शहरातील सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
     
बदलापूर पश्चिमेकडील गौरी हॉलमध्ये मंगळवारपासून (ता.२५) कोविड रुग्णालय कार्यान्वित झाले आहे. शुक्रवारी राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले होते. मात्र डॉक्टर व इतर रुग्णालय कर्मचारी उपलब्ध झालेले नव्हते. त्यामुळे लोकार्पण झाल्यानंतर दोन दिवस हे रुग्णालय सुरू झाले नव्हते. मात्र नगर परिषद प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करून आउटसोर्सिंगच्या माध्यमातून डॉक्टर,परिचारिका व इतर रुग्णालय कर्मचारी उपलब्ध करून घेतले. त्यामुळे मंगळवारपासून हे कोविड रुग्णालय बदलापूरकरांना रुग्णसेवा देण्यास सज्ज झाले आहे. या रुग्णालयात तीन शिफ्टमध्ये १४ डॉक्टर सेवा देणार असून पहिल्याच दिवशी दाखल झालेल्या दोन रुग्णांवर उपचार सुरू झाले आहेत. या रुग्णालयात  ३० आयसीयू बेड, २०० बेड सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी उपचार करण्यासाठी तसेच ५० ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पुढील काळात आवश्यकतेनुसार बेडची संख्या वाढवण्यात येणार आहे.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेले कोरोना चाचणी केंद्रही येत्या एक-दोन दिवसांत कार्यान्वित होणार आहे. याठिकाणी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. एक मशीन बसविण्याचे काम सुरू आहे. ते पूर्ण होताच कोरोना चाचणी केंद्र कार्यान्वित होणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून  दररोज दोन हजार चाचण्या  होणार असून त्या  मोफत असणार आहेत.

बदलापूरातील गौरी हॉलमध्ये सुरू करण्यात आलेले कोविड रुग्णालय मंगळवारपासून कार्यान्वित झाले असून येथे रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहेत.  कोरोना चाचणी केंद्रावर शेवटचे मशीन बसविण्याचे काम सुरू असून एक-दोन दिवसात हे केंद्रही कार्यान्वित होणार आहे. येथेही मोफत चाचणी केली जाणार आहेत.

संबंधित पोस्ट