
नगर परिषद प्रशासन तारखा देवुन करत आहे नागरिकांची दिशाभुल . त्यामुळे बदलापुरकर करतात कोविड रुग्णालयाची प्रतिक्षा .
- by Rameshwar Gawai
- Aug 21, 2020
- 411 views
बदलापूर (प्रतिनिधी) : बदलापूरकरांची कोविड रुग्णालयाची प्रतिक्षा संपायला तयार नाही. बदलापूरातील गौरी हॉलमध्ये नगर परिषदेमार्फत कोविड रुग्णालय सुरू होणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचा दावाही प्रशासनाकडून करण्यात आला आहे. मात्र अद्याप हे रुग्णालय सुरू होत नसल्याने या विलंबामागचे गौडबंगाल काय? असा सवाल शहरातील सुज्ञ नागरिक उपस्थित करीत आहेत.
जुलै महिन्याच्या अखेरीस कुळगाव बदलापूर नगर परिषद सभागृहात आमदार किसन कथोरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत बदलापूर पश्चिम भागातील गौरी हॉलमध्ये नगर परिषदेमार्फतच रुग्णालय सुरू होणार असल्याची माहिती नगर परिषद प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. या हॉस्पिटल मध्ये सुरुवातीला ऑक्सीजन सुविधा असलेले १०० बेड व आयसीयुचे १० बेड्स सुरू करण्यात येतील. त्यासाठी १५ एमबीबीएस, बीएचएमएस व बीएएमएस डॉक्टर, ३० नर्स व सुमारे ४० वॉर्डबॉय असे कर्मचारी नेमण्यात आले आहेत. रुग्णालयात लागणारे सर्व साहित्य प्रशासन पुरवणार असून या रुग्णालयाच्या माध्यमातून बदलापूर शहरातील जनतेला मोफत उपचार मिळणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे या कोविड रुग्णालयाकडे सर्वसामान्य नागरिकांचे डोळे लागले आहेत. मात्र अद्यापही हे रुग्णालय सुरू झालेले नाही.
बदलापूरात सोनिवली येथे कोविड केअर सेंटर असले तरी तेथे व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड अशी सुविधा नसल्याने श्वसनाचा व इतर त्रास असलेल्या रुग्णांवर उपचार करणे शक्य होत नाही. त्यामुळे या रुग्णांना उपचारार्थ उल्हासनगर, ठाणे वा मुंबईच्या रुग्णालयात उपचारासाठी अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. नाहीतर नाईलाजस्तव परवडत नसतानाही खाजगी रुग्णालयांची वाट धरावी लागते. गेल्या दोन-तीन महिन्यांच्या काळात अशा प्रकारे कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या खाजगी रुग्णालयांकडून अव्वाच्या सव्वा बिल आकारणी करून एकप्रकारे लूट करण्यात होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कोविड रुग्णांची होत असलेली ही ससेहोलपट टाळण्यासाठी कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून कोविड रुग्णालय सुरू करण्याची मागणी बदलापूरातील राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी लावून धरली आहे. सर्वात आधी आमदार किसन कथोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे बदलापूरात नगर परिषदेमार्फत कोविड रुग्णालय सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर नगर परिषद सभागृहात आयोजित सर्वपक्षीय सभेतही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या मुद्द्यावर प्रशासनाला धारेवर धरून नगर परिषदेमार्फतच रुग्णालय सुरू करावे, अशी आग्रही मागणी केली होती.
शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी तर नगर परिषदेमार्फत कोविड रुग्णालय सुरू न झाल्यास प्रशासनाला शिवसेनेच्या आक्रोशाला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला होता. रुग्णालय सुरू करण्यास डॉक्टर्स, परिचारिका यांची कमतरता ही अडचण असल्याचे नगर परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गौरी हॉलला भेट दिली. येथे कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी डॉक्टर्स उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे बदलापुरात नगर परिषदेच्या माध्यमातून रुग्णालय सुरू होण्याच्या मार्गातील अडचणी दूर झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यांनंतर नगर परिषद प्रशासनाकडूनही रुग्णालय उभारणीचे काम जवळपास पूर्ण झाले असून लवकरच रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र अद्यापही रुग्णालय सुरू झालेले नाही. विशेष म्हणजे दरम्यानच्या काळात अल्पावधीत शहरात खाजगी कोविड रुग्णालये सुरू झाली आहेत. त्यामुळे या विलंबामागचे गौडबंगाल काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम