वादळी वाऱ्याच्या तडाख्याने बारा दिवसांपासून वीजपुरवठा विस्कळीत

बदलापूर (प्रतिनिधी) : वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे विस्कळित झालेला बदलापुर ग्रामीण भागातला वीजपुरवठा अद्याप सुरळीत झालेला नाही. कमी दाबाने होत असलेला वीजपुरवठयामुळे विजेच्या लपंडावाने स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. शेती तसेच शेतीपूरक व्यवसायालाही याचा फटका बसला आहे. त्याचप्रमाणे या भागात असलेल्या संगोपिता या विशेष मुलांच्या निवासी शाळेतील विद्यार्थ्यांचीही प्रचंड गैरसोय होत आहे.
               
सुमारे बारा दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे बदलापूर जवळच्या बेंडशीळ, चिकण्याची वाडी, चिंचवली आणि चाफ्याची वाडी या भागांना वादळी वाऱ्याचा जबरदस्त फटका बसला. त्यात अनेक घरांचे नुकसान झाले आहे. त्याशिवाय मोठया प्रमाणात वृक्ष उन्मळून पडले असून विजेचे पोलही वाकले आहेत. त्यामुळे या भागातील वीजपुरवठाही विस्कळीत झाला आहे. काही ठिकाणी तासनतास वीजपुरवठा खंडित होत आहे, तर काही ठिकाणी कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. विस्कळीत झालेल्या या वीज पुरवठ्यामुळे बेंडशीळ परिसरातील रहिवासी पुरते हैराण झाले आहेत. कमी दाबाच्या विजेमुळे घरातील विद्युत उपकरणे योग्य प्रकारे चालत नसून ती नादुरुस्त होण्याची भीती रहिवासी व्यक्त करीत आहेत. या परिसरात असलेल्या शेतकऱ्यांना तसेच पोल्ट्री आदी शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्यांनाही विस्कळीत झालेल्या वीजपुरवठयामुळे काम करणे कठीण झाले आहे. या परिसरात असलेल्या संगोपिता या विशेष मुलांच्या निवासी शाळेत सुमारे साठ विद्यार्थी असून विजेमुळे त्यांना आंघोळी व इतर वापरासाठी पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांची, शेतकऱ्यांची, व्यावसायिकांची व विद्यार्थ्यांची होत असलेली ही गैरसोय दूर करण्यासाठी महावितरणने लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करावा,अशी मागणी स्थानिक नागरीकांनी केली आहे.

वादळ वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे  बेंडशीळ व इतर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विजेचे खांब व झाडे कोसळून पडली. त्यामुळे अनेक ठिकाणी विजवाहक तारा तुटून व इतर बिघाड होऊन वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. तो पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरात लवकर  हा वीजपुरवठा सुरळीत केला जाईल.

श्री.राहुल सोनटक्के . उपकार्यकारी अभियंता . महावितरण,बदलापूर पूर्व विभाग .

संबंधित पोस्ट