वरिष्ठ पोलीस निरीक्षक धुमाळ यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर

अंबरनाथ / प्रतिनिधी : अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला असून याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संजय धुमाळ सन १९९३ पीएसआय बॅचचे  पोलीस अधिकारी असून त्यांनी सप्टेंबर २०१९ मध्ये अंबरनाथ पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला.

अंबरनाथला येण्यापूर्वी संजय धुमाळ यांनी ठाण्यात नौपाडा येथे गुन्हे निरीक्षक आणि वाहतूक विभागात पोलीस निरीक्षक म्हणून कामकाज पाहिले होते. शिस्तबद्ध तसेच प्रेमळ पण गुन्हेगारांचे कर्दनकाळ अशी संजय धुमाळ यांची पोलीस खात्यात वेगळी ओळख आहे. आतापर्यंत त्यांनी पोलीस खात्यात २९ वर्ष सेवा केली आहे. नौपाडा येथे लागलेल्या एका आगीच्या दुर्घटनेतून संजय धुमाळ यांनी १९ जणांचे प्राण वाचवले होते. याखेरीज विविध चोरीच्या प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या अंबरनाथमध्ये सहा महिन्यांच्या कारकिर्दीत संजय धुमाळ यांनी ३२ रिवार्ड प्राप्त केले आहेत. त्यांच्या या  कार्याची दखल घेऊन त्यांची राष्ट्रपती पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. याबाबत समजताच अंबरनाथ शहरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संबंधित पोस्ट