चौथ्यांदा सहाय्यक नगररचनाकार तोडणकर पुन्हा बदलापूर नगरपालिकेत

बदलापूर (प्रतिनिधी) : सर्वाधिक काळ कुळगाव बदलापूर नगर परिषदेत सहाय्यक नगररचनाकार म्हणून पद सांभाळलेल्या सुदर्शन तोडणकर यांची पुन्हा कुळगाव बदलापूर नगर परिषदेत नियुक्ती करन्यात आली आहे .आतापर्यंत तीन वेळा म्हणजे तब्बल बारा वर्षे ते कुळगाव बदलापूर नगर परिषदेत कार्यरत होते. सन २०१७ मध्ये बदली होऊनही तब्येतीचे कारण देत ते बदलीच्या ठिकाणी रूजू झाले नव्हते. पुन्हा या अधिकाऱ्याची कुळगाव बदलापूर नगर परिषदेतच बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पहिल्यांदा सन २०००- २००४ पर्यंत, नंतर  सन २००६-२०१० पर्यंत व त्यांनंतर सन २०१३- २०१७ पर्यंत अशी तब्बल १२ वर्ष सुदर्शन तोडणकर कुळगाव बदलापूर नगर परिषदेत कार्यरत होते अशी माहिती पालिकेच्या आस्थापना विभागाने दिली आहे. सन २०१३ मध्ये तोडणकर यांची पनवेल पालिकेत बदली झाली मात्र तब्येतीचे कारण देत त्या ठिकाणी त्यांनी कार्यभार स्विकारला नव्हता. दोन वर्ष विनापरवानगी रजेवर असल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश नगररचना सहसंचालकांनी त्यावेळी दिले होते. बदलापूर परिषदेतच सन २०१५ मध्ये पुन्हा त्यांची प्रतिनियुक्ती झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. सन २०१७ मध्ये त्यांची बदली श्रीरामपूर येथे झाली. मात्र तब्येतीचे कारण देत तेथेही त्यांनी पदभार स्विकारला नसल्याचे समोर आले आहे. इतर काळात नियुक्ती नसतानाही कुळगाव बदलापूर नगर परिषदेत नगररचना विभागाचे कामकाज पाहिल्याने त्यांच्या निर्णयांची चौकशी करण्यात येत होती. मात्र २ वर्षे ८महिने पदभार न स्विकारणाऱ्या या अधिकाऱ्याची पुन्हा कुळगाव बदलापूर नगरपालिकेच वर्णी लागल्याने चर्चेला  उधाण आले आहे. राज्यभरात अनेक नगररचनाकार असतानाही आलटून पालटून एकाच अधिकाऱ्याची एकाच पालिकेत सातत्याने नियुक्ती कशी होते, असा सवाल आता उपस्थित केला जातो आहे. या बदलीत सत्ताधारी पक्षाच्या जिल्ह्यातल्या एका बड्या नेत्याचा आशिर्वाद असल्याचीही चर्चा होत आहे. काही स्थानिक लोकप्रतिनिधी या अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी वरिष्ठ मंत्र्यांच्या पायऱ्या झिजवत असल्याची चर्चा गेल्या वर्षात रंगली होती. दरम्यान, चौकशी आणि बदलीप्रकरणी सुदर्शन तोडणकर यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी पत्रकारांनी त्यांच्याशी दूरध्वनीवरून वारंवार संपर्क केला. मात्र आवाज येत नसल्याचे कारण देत त्यांनी बोलणे टाळले. तर कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी दिपक पुजारी यांना याबाबत विचारले असता, कोणत्याही अधिकाऱ्याची सुरू असलेली चौकशी निष्पक्षपणे पार पाडली जाईल. प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या चौकटीत राहूनच काम करणे अपेक्षित आहे. त्यामुळे चौकशीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचा दावा पुजारी यांनी केला आहे.

संबंधित पोस्ट