अंबरनाथचा तावली डोंगर खचतोय. तीन टोकांचा डोंगर म्हणून तावलीचा डोंगर प्रसिद्ध एक टोक खचल्याने चिखलोली धरणाला धोका.
- by Rameshwar Gawai
- Aug 11, 2020
- 497 views
अंबरनाथ (प्रतिनिधी) : अंबरनाथ तालुक्यातला तीन टोकांचा डोंगर म्हणून प्रसिद्ध असलेला तावलीचा डोंगर खचायला सुरुवात झाली आहे . या डोंगराचं एक टोक ढासळलं असून यामुळे मोठ्या प्रमाणात दगड-धोंडे, मोठमोठे खडक खाली आलेले आहेत . हा डोंगर खचत असल्याने त्याच्या नजीक असलेल्या चिखलोली धरणाला धोका निर्माण झाला आहे . डोंबिवलीपासून बदलापूरपर्यंतच्या भागातून हा तीन टोकांचा तावलीचा डोंगर दिसतो. या तीन टोकांपैकी मधल्या टोकावर काही दिवसांपूर्वी वीज कोसळली, आणि तेव्हापासून हा भाग खचायला सुरुवात झाली. सध्या या डोंगराचा लक्षणीय भाग ढासळला असून मधल्या भागात एक मोठा पट्टा तयार झाला आहे.
या भागातून मोठ्या प्रमाणात दगड, धोंडे, मोठे खडक सातत्याने खाली येतात .तर या डोंगरातून उगम पावणारा ओढा हा अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणाचा प्रमुख जलस्रोत आहे. मात्र सध्या हा ओढा सुद्धा बुजण्याच्या मार्गावर आहे. शिवाय हेच दगडधोंडे चिखलोली धरणाच्या पात्रात जात असल्याने चिखलोली धरणाच्या भिंतीवर दाब वाढण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे , असे असले तरी महसूल विभाग, वनविभाग, लघुपाटबंधारे विभाग यापैकी कुणीही अद्याप याकडे लक्ष दिलेलं नाही. अंबरनाथमधील निसर्गमित्र सुधाकर झोरे हे यासाठी पाठपुरावा करीत आहेत, शिवाय स्थानिक आमदार बालाजी किणीकर यांनीही याबाबत पत्रव्यवहार केला आहे . मात्र तरीही अजून तरी शासकीय यंत्रणेला जाग आलेली नाही.
या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे निसर्गमित्र सुधाकर झोरे म्हणाले की मी ही बाब पाटबंधारे विभाग , स्थानिक आमदार डॉ बालाजी किणीकर व राज्य सरकारच्या निदर्शनास आणली आहे , हे गंभीर प्रकारण असून त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे .
डॉ बालाजी किणीकर ( आमदार ) या घटनेची माहिती मी अंबरनाथचे तहसीलदार, ठाणे जिल्हाधिकारी यांना दिलीं असून लवकरच त्याची पाहणी करून सुरक्षिततेबाबत आराखडा तयार करण्यात येईल .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम