बदलापुरातील ८० वर्षांपूर्वीचा रस्ता लॉक डाऊन काळात रात्रीत गायब.

पालिकेकडून जागा मालकाविरोधात गुन्हा दाखल.

बदलापूर (प्रतिनिधी) : बदलापूर गावातील पालिकेचा एक रस्ता अचानक गायब झाला आहे. यामुळे आबाल वृद्धांना चिखलातून मार्ग  काढावा लागत आहे. आमचा ८०  वर्षापूर्वीचा रस्ता चोरीस गेला आहे, तो आम्हाला शोधून द्या, अशी मागणी या भागातील नागरिक करत आहे. यामुळे पालिकेने जागेच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बदलापूर गावातील वार्ड क्रमांक तीन मधील काही महिला चिखलातून कसाबसा मार्ग काढत आहे. मात्र तीन महिन्यांपूर्वी याच ठिकाणी लहान मुले, महिला हे डांबरी रस्त्यावरुन ये-जा करत होते. मात्र एका दिवशी त्यांच्या रोज येण्या-जाण्याचा रस्ता गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांना धक्का बसला. आता या सर्वाना येण्या-जाण्यासाठी रस्ताच राहिला नसल्याने ऐन पावसाळ्यात त्यांच्या दळणवळणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

बदलापूर गावातील वार्ड क्रमांक तीनमधील पाण्याच्या टाकीच्या बाजूने एक रस्ता आहे. या भागातील शेतकऱ्यांसह ४० ते ५०  कुटुंबासाठी प्रमुख दळणवळणाचा मार्ग होता. मात्र या रस्त्याचा २००  मीटर भाग हा एका खाजगी जागा मालकाने जेसीबीच्या सहाय्याने अक्षरश: उखडून फेकून दिला. आता या रस्त्याचे अस्तित्व नष्ट झाले आहे. एवढेच नाही तर एका ठिकाणी चर खणून तो मार्गही बंद केला आहे .
आधीच शहरात कोविडसारख्या गंभीर आजाराचा प्रादुर्भाव असताना रिक्षा, रुग्णवाहिका सोडा तर साधी दुचाकीही आत येऊ शकत नाही. त्यामुळे ८०  वर्षापासूनचा  हा जुना रस्ता पालिकेने लवकरात लवकर बनवून द्या, अन्यथा उपोषण करु असा इशारा या नागरिकांनी दिला आहे.
“हा रस्ता माझ्या जागेतून जात असल्याने मी तो बंद केला आहे. मात्र पालिकने आमच्याकडून कायदेशीर परवानगी मागितली तर रस्ता तयार करायला आमची कोणतीही हरकत नाही,” अशी भूमिका जागेचे मालक नंदकुमार भोपी यांनी घेतली आहे.

कुळगाव बदलापूर पालिकेने जागेच्या मालकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्याला नोटीस बजावली आहे. तसेच त्याच्याकडून नुकसान भरपाई वसूल करण्याचे आदेश दिले असल्याचे पालिकेचे मुख्यधिकारी दीपक पुजारी यांनी सांगितले आहे .

मात्र ऐन पावसाळ्यात रस्ता बंद झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना वेठीस न धरता जागा मालक आणि पालिका यांनी यावर लवकरात लवकर तोडगा काढावा, तसेच हा रस्ता सुस्थितीत करावा अशी मागणी या ठिकाणी राहणारे करत आहेत.

संबंधित पोस्ट