कुळगाव बदलापूर नगर परिषद शाळेचा निकाल १०० टक्के
- by Rameshwar Gawai
- Jul 30, 2020
- 815 views
बदलापूर (प्रतिनिधी) : कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत चमकदार कामगिरी केली आहे. नगर परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळेचा निकाल १०० टक्के तर उर्दू माध्यमाच्या शाळेचा निकाल ९५ टक्के लागला आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे प्रशासक जगतसिंग गिरासे, मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी या गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळेतून वैष्णवी काकडे ही विद्यार्थिनी ८३. ४० टक्के गुण मिळवून पहिली आली आहे. तर प्रतीक्षा शिंगोळे (७९.४०) ,छाया पालव (७६ टक्के) व साहिल भिलारे यांनी (७५. २०) टक्के गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांक मिळविला आहे. उर्दू माध्यमाच्या शाळेतून तसकील शेख (९०.४० टक्के ) प्रथम क्रमांक मिळवला आहे. साना मुजावर (८६. ४० टक्के ) व शाफीया चौधरी (७५.८० टक्के ) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे. मराठी माध्यमाच्या शाळेतून २५ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी ४ विद्यार्थी विशेष श्रेणीमध्ये, ६ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये तर ६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. उर्दू माध्यमाच्या शाळेतुन १८ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ३ विद्यार्थी विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. ६ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये तर ४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. कुळगाव बदलापूर नगर परिषदेने सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षांपासून दहावीचे वर्ग सुरु केले आहेत. पहिल्या वर्षी मराठी माध्यमाचा निकाल ८२ टक्के तर उर्दू माध्यमाचा ७८ टक्के निकाल लागला होता. हा निकाल अधिक चांगला लागण्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांमुळे यंदाच्या दुसऱ्या वर्षी उर्दू व मराठी माध्यमांच्या शाळांच्या निकालाचा टक्का वाढला आहे, याबद्दल कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या शिक्षण विभागाचे प्रमुख विलास जडये यांनी आनंद व्यक्त केला आहे. नगर परिषदेतील तत्कालीन सर्व सदस्य, नगराध्यक्ष प्रियेश जाधव , उपनगराध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती राजश्री घोरपडे व मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांचे यासाठी सहकार्य मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम