सुरक्षा रक्षक,माथाडी कामगार व अन्य घटकांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करुन त्यांना रेल्वे प्रवासासाठी क्युआर कोड ई पास देण्याच्या मागणीसाठी वाशी रेल्वे स्थानकासमोर या घटकांचे धरणे आंदोलन.

नवीमुंबई (प्रतिनिधी) : मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नव्यामुंबईतील अन्न-धान्य,कांदा-बटाटा,भाजी व फळे आणि मसाला मार्केट आवारात तसेच अन्य ठिकाणचे व्यवसाय/उद्योगात नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या मालाची चढ- उताराची कामे करणा-या महाराष्ट्र शासनाच्या विविध माथाडी बोर्डातील नोंदीत माथाडी, वारणार,मापाडी व पालावाला महिला कामगार,सुरक्षा देणा-या सुरक्षा रक्षक कामगार तसेच कार्यालयीन सेवेत काम करणा-या कर्मचा-यांना अत्यावश्यक सेवेतील घटक म्हणून त्यांना मध्य,पश्चिम व हार्बर लाईनवरील रेल्वेने प्रवास करण्यासाठी रेल्वे प्रशासना- कडून क्युआर कोड ई पास देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य माथाडी,ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील व अन्य पदाधिका-यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दि.२२ जुलै,२०२० रोजी सकाळी १०-०० ते ११-०० पर्यंत वाशी रेल्वे स्थानकाबाहेर ५० ते ६० कार्यकर्त्यांचे धरणे आंदोलन आयोजित केले असल्याचे युनियनने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

कोरोना या महाभयंकर संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने संपुर्ण ठिकाणी दि.२२ मार्च,२०२० पासून लॉकडाऊन जाहिर केला होता,या कालावधीत नव्यामुंबईतील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या अन्न-धान्य,कांदा-बटाटा,मसाला मार्केट, भाजीपाला व फळे मार्केट आवारातून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होण्यासाठी या बाजारपेठा तसेच गॅस सिलेंडर,रेल्वे माल धक्क्यावर येणारे धान्य,खत व अन्य जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणा-या बाजारपेठा व उद्योग शासनाने चालू ठेवले आहेत आणि या बाजारपेठा/उद्योगात महाराष्ट्र शासनाच्या विविध माथाडी बोर्डात नोंदीत असलेले माथाडी, वारणार,मापाडी, पालावाला महिला कामगार जीवनावश्यक वस्तूंच्या मालाची लोडींग,अनलोडींगची कामे आणि कार्यालयीन सेवेत कर्मचारी काम करीत आहेत,माथाडी कामगार व अन्य घटक मध्य व पश्चिम रेल्वे व हार्बर लाईनच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत,कसारा,पनवेल पर्यंतच्या परिसरात व पश्चिम रेल्वे लाईनच्या चर्चगेट ते वसई-विरार पर्यंतच्या परिसरात रहात असून,या दरम्यानच्या स्थानकावरुन रेल्वे प्रवास करीत असतात. लॉकडॉऊन कालावधीत नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या मालाची चढ-उताराची कामे करणा-या शासनाच्या माथाडी बोर्डातील नोंदीत माथाडी,वारणार,मापाडी, पालावाला महिला कामगार, कार्यालयीन कर्मचारी यांचा अत्यावश्यक सेवेत सामावेश करुन अत्यावश्यक घटकांसाठी सुरु केलेल्या रेल्वेतून या घटकाला प्रवास करण्यासाठी आवश्यक क्युआर कोड ई-पास,मासिक/त्रेमासिक पास/रेल्वे तिकिट देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य माथाडी,ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने महाराष्ट्र शासन व रेल्वे प्रशासनाकडे केलेली आहे,परंतु या घटकाला रेल्वे प्रवास करण्यास मनाई केली जात आहे,त्यामुळे या घटकांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे, अत्यावश्यक सेवेतील घटकांसाठी केंद्र व राज्य सरकारने सुरु केलेल्या रेल्वेने माथाडी व अन्य घटकांना अत्यावश्यक सेवेतील घटक म्हणून रेल्वे प्रवास करण्यास परवानगी द्यावी,या घटकाला केंद्र व राज्य सरकारच्या कोव्हिड-१९ संबंधित विमा कवच संरक्षण द्यावे या व अन्य मागण्या महाराष्ट्र शासन व संबंधितांकडे महाराष्ट्र राज्य माथाडी,ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने केलेल्या आहेत,परंतु या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.

जीव धोक्यात घालून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होण्यासाठी काम करणा-या घटकाला रेल्वे प्रवास करण्यास परवानगी मिळणे आवश्यक आहे. तेंव्हा सदर घटकाला मध्य व पश्चिम रेल्वे व हार्बर लाईनवरील रेल्वेने प्रवास करण्यास क्युआर कोड ई-पास,मासिक/त्रेमासिक पास/रेल्वे तिकिट मिळण्याच्या मागणीसाठी बुधवार दि.२२ जुलै, २०२० रोजी सकाळी १०-०० वाजतां माथाडी कामगार व अन्य घटक वाशी रेल्वे स्थानकाबाहेर धरणे आंदोलन करणार आहेत. माथाडी कामगार व अन्य घटकांच्या या न्याय मागणीची रेल्वे प्रशासन आणि अन्य संबंधितांकडून दखल घेतली जावी व या घटकाला न्याय द्यावा,अशी मागणी शेवटी माथाडी कामगार नेत्यांनी पत्रकातून केलेली आहे.

संबंधित पोस्ट