बदलापुर येथिल कोविड केअर सेंटरमधील असुविधा दूर करण्याची मागणी .

बदलापूर (प्रतिनिधी) : बदलापूर पश्चिमेकडील सोनीवली येथे सुरु करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये योग्य सोयीसुविधा मिळत नसल्याचा आरोप करणारा एक व्हिडीओ अलीकडेच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे येथील कारभाराविषयी सर्वसामान्य नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या वतीने आयोजित सर्वपक्षीय सभेत उपस्थित राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीही या मुद्द्यावर प्रशासनाला धारेवर धरत तातडीने त्रुटी दूर करून रुग्णांना चांगल्या सोयीसुविधा देण्याची मागणी केली.  

बदलापूर पश्चिमेकडील सोनीवली येथे लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी येथील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या ठिकाणी गरम पाणी, वेळच्या वेळी जेवण व औषधे मिळत नसल्याचा तसेच स्वच्छतेबाबत  तक्रार  करत असताना रुग्ण या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. आमदार किसन कथोरे यांनी बदलापुरात नव्याने सुरु करण्यात येणारी कोविड केअर सेंटर खाजगी रुग्णालयांना न देता नगर परिषदेमार्फत चालविण्यात यावी या मागणीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या

निवेदनातही या व्हिडिओचा उल्लेख केला आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी तसेच  सूचना मागविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय सभेतही हा मुद्दा चर्चेत आला. शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी येथील डॉक्टर व इतर कर्मचारी चांगल्या प्रकारे काम करीत असल्याचे सांगून काही किरकोळ त्रुटी तातडीने दूर करण्याची मागणी केली. तर रुग्णांना जेवण, औषधे वेळेवर मिळाली पाहिजेत. अशी मागणी भाजपाचे प्रवक्ते राजेंद्र घोरपडे यांनी केली. रुग्णांच्या भोजन व्यवस्था वेळच्या वेळी व्हावी या साठी भोजन व्यवस्था कंत्राटाचे विकेंद्रीकरण करावे अशी सूचना त्यांनी मांडली. रुग्णांना कचरा टाकण्यासाठी डस्टबिन त्याचप्रमाणे सॅनिटायजर, मास्क, रुमाल, टॉवेल असे  एखादे छोटे किट द्यावे, अशी मागणी घोरपडे यांनी केली. या छोट्या छोट्या त्रुटी आहेत. त्या प्रशासनाने तातडीने दूर कराव्यात. त्याचप्रमाणे  रुग्णांची भोजन व्यवस्था वेळच्या वेळी व्हावी यासाठी या कामाच्या कंत्राटाचे विकेंद्रीकरण करण्याची मागणीही राजेंद्र घोरपडे यांनी केली. यावर मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी रुग्णांसाठी डस्टबिन व इतर साहित्य उपलब्ध असून ते वितरित करण्यास एक दिवस विलंब झाल्याचे सांगितले. भोजन व्यवस्थेच्या कंत्राटासाठी नव्याने निविदा मागविण्यात आले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. साफसफाईसाठी कामगार वाढवा,पण स्वच्छता राहिली पाहिजे अशी मागणी वामन म्हात्रे यांनी केली. या ठिकाणचे कर्मचारी रुग्णांना चांगली वागणूक देत नसल्याचा आरोप भाजपाचे शहराध्यक्ष संजय भोईर यांनी केला. यावर प्रशासक जगतसिंग गिरासे यांनी रुग्णांना चांगली वागणूक मिळाली पाहिजे, असे सांगून बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना मुख्याधिकारी दीपक पुजारी यांना दिल्या.  

संबंधित पोस्ट