बदलापूरात सुरू होणार कोविड टेस्ट सेंटर.

बदलापूर / प्रतिनिधी : बदलापूर करांना कोरोना टेस्टसाठी अद्यापही मुंबईवर अवलंबून रहावे लागत आहे. मात्र आता लवकरच बदलापुरात कोविड टेस्ट सेंटर सूरु होणार आहे. त्यामुळे रिपोर्टसाठी होणारा विलंब टळून रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे. 

कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या वतीने आयोजित सर्वपक्षीय सभेत प्रशासक जगतसिंह गिरासे यांनी ही माहिती दिली. बदलापूर पूर्वेकडील गावदेवी भागात नगर परिषदेच्या इमारतीत हे कोविड टेस्ट सेंटर सुरू होणार आहे. याठिकाणी दररोज सुमारे दोन हजार रुग्णांची  चाचणी मोफत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बदलापूर व अंबरनाथ शहर तसेच अंबरनाथ ग्रामीण तालुक्यातील नागरिकांसाठी हे कोविड टेस्ट सेंटर असेल. जेजे रुग्णालयात कोविड टेस्ट सेंटरची उभारणी करणारी संस्था बदलापूरात कोविड टेस्ट सेंटर उभारणार आहे. नगर परिषदेने त्यांना मनुष्यबळ उपलब्ध करून द्यायचे आहे. यासाठी उल्हासनगर येथील एका पॅरामेडिकल संस्थेशी यासंदर्भात संपर्क करण्यात आला असून त्यांच्याकडून हे मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येणार असल्याचेही प्रशासक जगतसिंह गिरासे यांनी स्पष्ट केले.

संबंधित पोस्ट