आता लॉकडाऊनमध्ये वाढ नको . अंबरनाथ बदलापुरातील व्यापाऱ्यांची मागणी

अंबरनाथ (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यांपासून दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य केले आहे. मात्र सातत्याने लॉकडाऊन वाढत असल्याने व्यापाऱ्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सध्या लागू असलेल्या लॉकडाऊनची मुदत संपल्यानंतर त्यामध्ये वाढ न करता दुकाने सुरु करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे. यासंदर्भात कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.      

अंबरनाथ व बदलापूर व्यापारी असोसिएशनची बैठक सोमवारी . अंबरनाथ येथे झाली. अंबरनाथ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष खानजीभाई धल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत व्यापाऱ्यांनी हा इशारा दिला आहे. रविवारी अंबरनाथ व बदलापूर शहरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनची मुदत संपणार होती. मात्र ती आता १९ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही मुदत संपल्यानंतर पुन्हा त्याला मुदतवाढ देऊ नये, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  मार्च २०२० पासून  शासनाच्या आदेशानुसार दोन्ही  शहरातील दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. या कालावधीत व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य केले ,त्यानंतरच्या  अनलॉकडाऊनच्या आदेशानंतर दुकाने सुरु होतील अशी आशा व्यापारी वर्गाला होती, मात्र पुन्हा पुन्हा लॉकडाऊन वाढत गेले होते.  लॉकडाऊन वाढीचा  परिणाम  रस्त्यावरील नागरिकांच्या गर्दीप्रमाणे  कोरोनारुग्ण वाढीवर  झाला नाही. दुकाने वगळता सर्व व्यवहार सुरळीत सुरु आहेत, त्यामुळे फक्त दुकाने बंद ठेवल्याने उध्वस्त होणाऱ्या व्यापारी वर्गाला दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. सोमवारी फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करीत बदलापुरातील व्यापाऱ्यांनी लॉकडाउनच्या संकटावर चर्चा केली. चार महिने दुकाने बंद असूनही आम्ही दुकानाचे भाडे, कर्मचाऱ्यांना वेतन दिले मात्र आता आमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न समोर उभा आहे, अशी प्रतिक्रिया संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र  जाधव यांनी दिली. प्रशासनाला सहकार्य करणाऱ्या दुकानदारांना लॉकडाउनच्या आदेशानुसार दुकाने बंद ठेवावी लागत आहेत. दुसरीकडे लॉकडाऊनमध्ये सुरु ठेवण्यास परवानगी असलेल्या अनेक दुकानांमध्ये फिजिकल डिस्टंसिंग व वेळेच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. ही बाब निदर्शनास आणून देऊनही प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाई होत नसताना लॉकडाउनच्या आदेशाचे पालन करणाऱ्या व्यापाऱ्यांना वेठीस का धरले जात आहे?  असा सवालही जाधव यांनी उपस्थित केला आहे.

संबंधित पोस्ट