बदलापूरमध्ये लवकरच सहाशे बेड्चे कोविड रुग्णालय
पाचशे जणांसाठी विलगीकरण कक्ष . प्रशासक जगतसिंग गिरासे यांनी दिली माहिती .
- by Rameshwar Gawai
- Jul 13, 2020
- 453 views
बदलापूर / प्रतिनिधी : बदलापूर शहरात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता शहरात सहाशे बेड्चे कोविड रुग्णालय आणि सुमारे पाचशे रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष सुरु करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी आणि बदलापूर पालिकेचे प्रशासक जगतसिंग गिरासे यांनी दिली. संशयित रुग्णांना शोधण्यासाठी "चेस द व्हायरस" हि योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
बदलापूर शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. बदलापूर आणि आसपासच्या ग्रामीण भागातील रुग्णांना ठाणे आणि मुंबई येथील रुग्णालयात दाखल करून घेण्यात अनंत अडचणी येत आहेत. बदलापूर शहरातील कोरोनाच्या रुग्णांना लवकरात लवकर उपचार मिळून तो बरा व्हावा यासाठी नगर परिषद प्रशासन प्रयत्नशील आहे. बदलापूर पश्चिमेकडील खाजगी असलेले गौरी मंगल कार्यालय नगर परिषदेने ताब्यात घेतले आहे. हे सभागृह अतिशय प्रशस्त आहे. चार मजली इमारती मध्ये सहाशे बेड्चे कोविड रुग्णालय सुरु करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी आणि बदलापूर पालिकेचे प्रशासक जगसिंग गिरासे यांनी दिली. गिरासे यांनी मुख्याधिकारी दीपक पुजारी आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत या सभागृहाची पहाणी करून हे सभागृह ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. या रुग्णालयात कोविड-१९ च्या रुग्णांवर उपचार करण्यात येतील. येथे ऑक्सिजन व्यवस्था असलेले बेड उपलब्ध करण्यात येणार आहेत. या रुग्णलयात लागणाऱ्या डॉक्टर, नर्स व अन्य स्टाफ आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे गिरासे यांनी सांगितले. बदलापूर पश्चिमेकडील गौरी हॉलमध्ये हे कोविड रुग्णालय तयार करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे पूर्वेकडील सह्याद्री सभागृह सुद्धा नगर परिषदेने ताब्यात घेतले असून तेथे सुमारे पाचशे जणांसाठी विलगीकरण कक्ष तयार करण्यात येणार असल्याचे जगतसिंग गिरासे यांनी सांगितले. यामुळे शहरातील कोरोना रुग्णांवर तातडीने उपचार करण्यात येतील. त्याच बरोबर संशयित रुग्णांना शोधण्यासाठी "चेस द व्हायरस" हि योजना प्रभावी पणे राबविण्यात येत आहे. परिणामी या महिन्याअखेर पर्यंत शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यास पालिका प्रशासनाला यश येईल असा विश्वास जगतसिंग गिरासे यांनी व्यक्त केला आहे.

रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम