..आता विजेचा लपंडाव संपणार. बदलापूरातील कात्रप,शिरगाव भागातील नागरिकांना मिळणार दिलासा .

बदलापूर / प्रतिनिधी : विजेच्या लपंडावाने हैराण झालेल्या बदलापूर पूर्वेकडील कात्रप, शिरगाव आदी भागातील नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे. गेल्या अनेक महिन्यां पासून प्रलंबित असलेले भूमिगत विद्युत वाहिनीचे काम पूर्ण करण्यात महावितरणला यश आले आहे. त्यानंतर शनिवारी पासून ही भूमिगत वाहिनी कार्यान्वित करण्यात आली आहे.त्यामुळे आता या भागातील विजेचा लपंडाव संपणार असून कात्रप उपकेंद्रातील वाहिन्यांद्वारे वीजपुरवठा होणाऱ्या कात्रप, शिरगाव आदी भागातील सुमारे तीस हजार नागरिकांना याचा फायदा होणार असल्याचा दावा महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.  

बदलापूर पूर्वेकडील कात्रप उपकेंद्रासाठी एसएसएमआर कॅपेक्स योजनेंतर्गत नव्याने टाकण्यात आलेली२२ केव्ही उच्च दाब वाहिनी शनिवारपासून कार्यान्वित करण्यात आली आहे. महावितरणच्या कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण करण्यात आल्याची माहिती महावितरणचे बदलापूर पूर्व विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता राहुल सोनटक्के यांनी दिली. या नव्या भूमिगत उच्च दाब वाहिनीमुळे कात्रप उपकेंद्रातील तीन वाहिन्यांद्वारे कात्रप, शिरगाव आदी भागात वीजपुरवठा केला जाणार आहे. पूर्वीची जुनी वाहिनी राखीव स्वरूपात राहणार आहे. त्यामुळे भूमिगत उच्च दाब वाहिनीवर कधी काही तांत्रिक बिघाड झाल्यास जुन्या वाहिनीवरून पर्यायी वीजपुरवठा करता येणार आहे. त्यामुळे या भागातील विजेचा लपंडाव संपणार आहे. 

बदलापूर पूर्वेकडील कात्रप, शिरगाव आदी भागात गेल्या काही वर्षांपासून विजेचा लपंडाव सुरू होता. दिवसा,रात्री-अपरात्री वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक पुरते हैराण झाले अलीकडे लॉकडाऊनच्या काळात वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांनाही याचा फटका बसला होता. त्यामुळे महावितरणच्या कारभाराविषयी नागरिकांमध्ये नाराजीचा सूर होता. पूर्वीची जुनी वाहिनी मोरीवली उप केंद्रातुन कात्रप उपकेंद्रात येत होती. या वाहिनीवर ठिकठिकाणी जोडण्या देण्यात आल्या होत्या. त्यामुळे जोडण्या दिलेल्या कोणत्याही भागात काही बिघाड झाल्यास या दुरुस्तीसाठी या वाहिनीवरून वीजपुरवठा देण्यात आलेल्या सर्व भागाचा वीजपुरवठा खंडित होत होता. मात्र जुलै अखेरपर्यंत भूमिगत उच्चदाब वाहिनीचे काम पूर्ण झाल्यावर ही समस्या दूर होणार असल्याचे महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता राहुल सोनटक्के यांनी सांगितले होते. त्यामुळे आता हे काम पूर्ण झाल्यानंतर तरी विजेचा लपंडाव संपावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

संबंधित पोस्ट