
नगर परिषदेने अँटीजेन टेस्ट मोफत करावी . संभाजी शिंदे यांची मागणी
- by Rameshwar Gawai
- Jul 10, 2020
- 699 views
बदलापूर (प्रतिनिधी) : कुळगाव बदलापूर नगर परिषदेने शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना कोरोनाची अँटीजेन टेस्ट मोफत करावी, अशी मागणी भाजपाचे माजी शहराध्यक्ष व ठाणे जिल्हा नियोजन समिती सदस्य संभाजी शिंदे यांनी कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे प्रशासक जगतसिंह गिरासे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ज्या नागरिकांची आर्थिक क्षमता नाही अशा नागरिकांची बीपीएल कार्ड,महात्मा फुले आरोग्य योजना , आयुष्यमान भारत योजना अंतर्गत मोफत अँटीजेन चाचणी करण्यात यावी. त्याशिवाय लोकप्रतिनिधींनी शिफारस केलेले गरीब, मध्यमवर्गीय यांनाही ही चाचणी नगर परिषदेने मोफत उपलब्ध करून द्यावी, अशी संभाजी शिंदे यांची मागणी आहे. यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या निर्देशानुसार शहरात उभारण्यात येणाऱ्या टेस्टिंग लॅब मध्ये हि सुविधा नगर परिषदने निर्माण करावी. यासाठी पुणे महानगर पालिकेच्या धर्तीवर अँटीजेन किट खरेदी प्रक्रिया करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी विनंती आपण निवेदनाद्वारे नगर परिषद प्रशासनाला केली असल्याचे शिंदे यांनी सांगितले. शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या हिताचा विचार करून नगर परिषद प्रशासनाकडून यासंदर्भात कार्यवाही होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम