बदलापूरमध्ये सुरू होणार कोरोना चाचणी केंद्र .

बदलापूर (प्रतिनिधी) : बदलापूरमध्ये आठवड्याभरात कोरोना चाचणी केंद्र सुरू होणार आहे. त्यामुळे अंबरनाथ, बदलापूर व लगतच्या परिसरातील रुग्णांची होत असलेली गैरसोय टळणार आहे. ठाण्याच्या पुढे सुरु होणारे शासनाचे हे पहिले कोरोना चाचणी केंद्र आहे. नगरपालिका हद्दीमधील राज्यातील पहिले कोरोना चाचणी केंद्र ठरणार आहे.

कोरोनाने संपूर्ण जगाला हादरा दिला आहे. मुंबई, ठाणे परिसरात कोरोनाचे रुग्ण  मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. बदलापूर, अंबरनाथ आणि ग्रामीण भागातील रुग्णांच्या कोरोनाची चाचणी साठी स्वॅब  घेऊन मुंबई येथील जे जे रुग्णालयात जात आहेत. आधीच मुंबई येथील चाचणी साठीची गर्दी त्यात या भागातून जाणारे सॅम्पल वाढत आहेत.  त्यामुळे  चाचणीचे रिपोर्ट येण्यासाठी प्रचंड वेळ लागत आहे. हा विलंब टाळण्यासाठी आणि या भागातील रुग्णांना तात्काळ चाचणी अहवाल मिळून वेळीच योग्य ते उपचार मिळावे यासाठी बदलापूर येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना चाचणी तपासणी केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या आठवड्यात हे केंद्र सुरु करण्यात येणार आहे. या चाचणी केंद्रामध्ये चाचणी होऊन चोवीस तासात अहवाल प्राप्त होणार असल्याने रुग्णांना पुढील उपचार करणे सोयीचे होणार आहे. बदलापूर, अंबरनाथ आणि ग्रामीण भागातील रुग्णांची फार मोठी सोय होणार आहे. मुंबई येथे जाण्याचा वेळ, पैसा आणि श्रम वाचणार आहे. शासनातर्फे हे केंद्र सुरु करण्यात येत असल्याचे  कुुुळगाव बदलापूर व

अंबरनाथ नगर परिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी जगतसिंह गिरासे यांनी सांगितले. दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे काही दिवसांपूर्वी बदलापूरला भेट देऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्याचवेळी येत्या १०-१५ दिवसांत ठाणे जिल्ह्यात पाच नवी कोरोना चाचणीकेंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते.

संबंधित पोस्ट