..तर मुंबई, ठाण्याच्या शहरी भागाचे पिण्याचे पाणी थांबवावे लागेल.
ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोनाबधितांना रुग्णालयात दाखल करून घेण्याबाबतच्या दुजाभावामुळे आमदार किसन कथोरे संतापले
- by Rameshwar Gawai
- Jul 07, 2020
- 1369 views
बदलापूर (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांना जर शहरी भागातील रुग्णालयात दाखल करून घेतले जात नसेल तर आम्ही आमच्या हजारो हेक्टर जमिनी देऊन तुम्हाला पाणी तरी कशाला द्यायचे? असा संतप्त सवाल उपस्थित करून भाजपाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आमदार किसन कथोरे यांनी ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना बधितांना मुंबई, ठाण्याच्या शहरी भागातील रुग्णालयात दाखल करून घेण्यात दुजाभाव होत असल्याचा आरोप केला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव आज उद्या संपेल. त्यानंतर रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल. मुंबईसह सर्व महापालिकांना ठाणे ग्रामीण जिल्ह्यातून जाणारे पाणी थांबवावे लागेल,असा इशाराही आमदार किसन कथोरे यांनी दिला आहे
अधिकारी, ना औषधांचा साठा, ना रुग्णवाहिका अशी अवस्था आहे. ग्रामीण रुग्णालयात सुद्धा कोरोना बाधितांसाठी पुरेशा सुविधा नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील एखादा रुग्ण शहरी भागातील मोठ्या रुग्णालयात स्थलांतरित करायचे असल्यास पुरेशी साधने उपलब्ध नाहीत. त्यात महापालिका हद्दीतील मोठ्या रुग्णालयामध्ये प्रवेश दिला जात नाही. ग्रामीण भागातील रुग्णांना महापालिका हद्दीतील रुग्णालयात प्रवेश न मिळाल्यामुळे या रुग्णांना मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. वास्तविक पाहता रुग्णाची चौकशी करून ग्रामीण भागातील असल्याने त्याला प्रवेश नाकारला जातो,ही गंभीर बाब असून याबाबत आरोग्य विभाग व महाराष्ट्र शासन मूग गिळून गप्प आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची मानसिकता खचत असून महापालिका प्रशासनाच्या आठ मुठेपणामुळे ग्रामीण भागातील जनतेला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्यातील बारमाही वाहणाऱ्या नद्यांवर बांधलेल्या धरणांच्या पाणीसाठ्यातुन मुंबई, ठाणे,कल्याण, उल्हासनगर, मीरा भाईंदर या महापालिकांना पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. ज्या भागात ही धरणे आहेत त्या भागातील एकाही गावाला या धरणातून पाणीपुरवठा होत नाही. या धरण क्षेत्रातील शेकडो गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मुंबई शहर व इतर महापालिकांना पाणीपुरवठा व्यवस्था व्हावी या नावाखाली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित असतानासुद्धा मुंबई शहर व इतर महापालिकांना पाणी उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संकटाला सामोरे जाणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे. महापालिका प्रशासन व प्रशासकीय अधिकारी यांचे असे फतवे आदेश राज्यशासन रद्द करणार नसेल तर ग्रामीण व शहरी अशा संघर्षाची ठिणगी पडून त्याचा भडका उडल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती आमदार कथोरे यांनी निवेदनात व्यक्त केली आहे. महापालिका क्षेत्रातील रुग्णालयांनी काढलेले फतवे, आदेश तातडीने रद्द करुन भविष्यातील शहरी, ग्रामीण संघर्ष टाळावा व ग्रामीण भागाला दिलासा दयावा, अशी विनंती आमदार किसन कथोरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम